मंगलाष्टका सुरू असतानाच नवरदेवाचे घर फोडले
By admin | Published: January 23, 2017 10:08 PM2017-01-23T22:08:06+5:302017-01-23T22:08:06+5:30
वधू-वरांवर अक्षता पडत असतानाच विवाह समारंभस्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेले नवरदेवाचेच घर फोडून
ऑनलाइन लोकमत
विटा (जि. सांगली) : वधू-वरांवर अक्षता पडत असतानाच विवाह समारंभस्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेले नवरदेवाचेच घर फोडून १ लाख ८० हजार रुपये रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने व किमती मोबाईल असा सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना सोमवार, दि. २३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रीरामनगर (विटा) येथे भोसले वस्तीवर घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
विटा एसटी आगारातील कर्मचारी संजय परशुराम भोसले यांचा मुलगा प्रफुल्ल श्रीनगर येथे लष्करात नोकरीस आहे. त्यांचा विवाह सोमवारी दुपारी १२.३८ वाजता मायणी रस्त्यावरील मंगल कार्यालयात होता. हे कार्यालय घरापासून थोड्याच अंतरावर आहे. दरम्यान, त्यांचे काही कुटुंबीय साडेबाराला घरला कुलूप घालून कार्यालयात गेले. तिकडे मंगलाष्टका सुरू असतानाच चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दरवाजाला आतून कडी घातली.
पहिल्यांदा चोरट्यांनी टीव्हीच्या कपाटाची झडती घेतली. परंतु, तेथे काहीही मिळाले नाही. त्यानंतर लोखंडी कपाटाचा दरवाजा कापड कापण्याच्या कात्रीने उचकटून रोख १ लाख ८० हजारांची रक्कम, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व किमती मोबाईल, असा सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजातून पलायन केले. हा प्रकार दुपारी एक वाजता घरी आल्यानंतर भोसले व त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अमरसिंह निंबाळकर, निरीक्षक मोहन जाधव, सहाय्यक निरीक्षक आशुतोष चव्हाण यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने मायणी रस्त्यावरील जयेश गार्डन हॉटेलपर्यंत मार्ग दाखविला. ठसे तज्ज्ञांनीही तपासणी केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत विटा पोलिस ठाण्यात सुरू होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन जाधव पुढील तपास करीत आहेत.