अतिक्रमण काढताना वृद्धेने घेतले पेटवून, मिरजेतील धक्कादायक प्रकार; महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 12:41 PM2023-06-01T12:41:08+5:302023-06-01T12:41:33+5:30
या घटनेमुळे महापालिका पथकाची धावपळ उडाली
मिरज : मिरजेत मालगांव रस्त्यावर , खोतनगर सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिका पथकासमोर सुमन मनोहर वाघमारे या वृद्ध महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. याप्रकरणी संबंधित महिलेसह दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.
मिरज-मालगांव रस्त्यावर खोतनगर गल्ली क्रमांक चार येथे सुमन वाघमारे, सुरेश वाघमारे यांनी महापालिकेच्या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केल्याची तक्रार आहे.हे अतिक्रमण हटविण्यासाठी मिरज सुधार समितीने आंदोलनाचा इशारा दिल्याने सहाय्यक आयुक्त अशोक कुंभार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी बुधवार सकाळी साडे अकरा वाजता अतिक्रमण हटविण्यास गेले होते. यावेळी यावेळी सुरेश वाघमारे महापालिका अधिकारी व कर्मचार्यांना शिवीगाळ करीत अंगावर धावून गेले. तर सुमन वाघमारे यांनी जवळच असलेल्या पेट्रोलपंपावरुन पेट्रोल आणून अंगावर ओतून पेटवून घेतले.
यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी अंगावर पाणी ओतून आग विझविली. यात सुमन वाघमारे या सुमारे २५ टक्के भाजल्या आहेत. जखमी सुमन वाघमारे यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे महापालिका पथकाची धावपळ उडाली. कारवाई न करताच महापालिका पथक परत गेले.
सहाय्यक आयुक्त अशोक कुंभार यांनी शहर पोलिसात सुमन वाघमारे व सुरेश वाघमारे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद दिली आहे. तर महापालिका शहरातील अधिकारी मोठी अतिक्रमणे न काढता सुधार समितीची सुपारी घेऊन गरिबांची घरे पाडत असल्याचा आरोप सुमन वाघमारे व सुरेश वाघमारे यांनी केला.