तलाठ्यासह दोघांना लाच घेताना पकडल
By admin | Published: January 13, 2015 10:57 PM2015-01-13T22:57:11+5:302015-01-14T00:34:47+5:30
गव्हाण : सात-बारासाठी पाच हजार घेतले
सांगली/तासगाव : खरेदी दस्ताची नोंद घालून सात-बारा उतारा देण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या गव्हाण (ता. तासगाव) येथील प्रभारी गावकामगार तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली. आज, मंगळवारी मणेराजुरी येथे कारवाई केली. लक्ष्मण वसंत थोरबोले (वय ५०, रा. भिलवडी, ता. पलूस) व अरुण मधुकर नलवडे (४३, तासगाव) अशी त्यांची नावे आहेत. थोरबोले हा तलाठी आहे.
थोरबोले डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील तलाठी आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे गव्हाणच्या तलाठी पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे, तर अरुण नलवडे झिरो तलाठी म्हणून काम करीत होता. गव्हाणमधील तक्रारदारास खरेदी दस्ताची नोंद घालून सात-बारा उतारा हवा होता. यासाठी त्यांनी थोरबोले याची भेट घेतली. यासाठी थोरबोले याने पाच हजार रुपये मागितले, नलवडे याने लाचेची रक्कम दिल्याशिवाय उतारा देणार नाही, असे सांगितले. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती.
तक्रारदाराने ‘आज, मंगळवार लाच देतो’, असे सांगितले होते. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. कामानिमित्त थोरबोले बाहेरगावी गेला होता. तो मणेराजुरी येथे असल्याचे समजताच तेथे सापळा लावला. थोरबोले व नलवडे सोबतच होते. दोघांनी तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच घेताच पथकाने त्यांना पकडले. याप्रकरणी रात्री उशिरा तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)