कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:08+5:302021-06-17T04:19:08+5:30
सांगलीत दादा आणि बाबांची चढाओढ नेहमीचीच. आधी कोण निवेदन देतंय, यासाठी दोघांची शर्यत! परिसरातल्या समस्या हेरायच्या अन् निवेदनं, पत्रं ...
सांगलीत दादा आणि बाबांची चढाओढ नेहमीचीच. आधी कोण निवेदन देतंय, यासाठी दोघांची शर्यत! परिसरातल्या समस्या हेरायच्या अन् निवेदनं, पत्रं द्यायची. मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत नुसता पत्रांचा मारा. त्यासाठी गृहपाठही करावा लागतो म्हणे. हे जाणून दादांची टीम विश्रामबागमधील त्यांच्या कार्यालयातून, तर बाबांची फौज वसंत कॉलनीतील त्यांच्या बंगल्यातून सकाळीच कामाला लागलेली असते. सोशल मीडियावर कार्यकर्ते, नागरिकांनी काही समस्या मांडली की, यांचं काम सुरू. लगेच पत्र तयार होतं. त्यात समस्या जशा असतात, तशा उपाययोजनाही सुचविलेल्या असतात हं. मग नंतर दिवसभर निवेदनांच्या कॉप्या अन् ती दिल्यानंतरची छायाचित्रं सोशल मीडियावर धडाधड पडत राहतात...
‘ते’ सध्या काय करतात?
ते जिल्ह्याचे नेते. जवळजवळ सगळा जिल्हा त्यांचा मतदारसंघ. पण, सध्या कोरोनाशी सगळा जिल्हा झुंजत असताना ‘ते’ गायब आहेत. अलीकडे ते प्रसारमाध्यमांतूनही झळकलेले दिसत नाहीत. दिल्लीत तर सध्या काहीच काम नाही, मुंबईत त्यांची सत्ता नाही. मग त्यांचा शोध घ्यायचा कोठे, अशी कुजबुज मतदारांतून ऐकू येते. कुणी म्हणतात, ते बाबा-महाराजांकडे गेलेत, तर कुणी म्हणतं, कारखान्यांसाठी जुळणी करताहेत. त्यांच्या खिशात दोन साखर कारखाने आहेत. दोन्ही त्यांच्या खासगी कंपन्यांनी विकत घेतलेत. पण मागच्या हंगामातली उसाची बिलं थकलीत. त्यासाठी सगळीकडं ओरड सुरू आहे. आता लोकांसमोर आलं की, उत्तरं द्यावी लागणार... म्हणूनच ते पुढं येत नाहीत म्हणे! ‘पब्लिक’ सब जानती है!!
काम वीतभर, चमकोगिरी हातभर
इस्लामपुरातील एक वरिष्ठ अधिकारी चमकोगिरीत माहीर आहेत. हल्ली ते ‘सुप्रसिद्ध’ व्याख्यातेही बनलेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी एक ग्रुप बनवला. त्यात परिसरातल्या नामवंतांना घेतलं. त्यांच्या आधारानं मदत गोळा झाली. ती हळूहळू वाटली गेलीही. पण या अधिकाऱ्यांना प्रसिद्धीचा सोस अंमळ जास्तच. मदत आली की, काढ फोटो, कर प्रकाशित आणि मदत वाटली की, काढ फोटो, पाठव सोशल मीडियावर, हाच उद्योग. त्यातही स्वत:ची छबी झळकवण्याची हौसच जास्त. आता मात्र दानशूरांनी हात आखडता घेतलाय... कारण काय तर, ‘यांचं काम वीतभर, चमकोगिरी हातभर!’
- श्रीनिवास नागे