कुजबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:20+5:302021-06-25T04:19:20+5:30
जिल्हा परिषदेतील अजितराव घोरपडे गटाच्या शिक्षण व आरोग्य सभापती आशाताई पाटील यांचे वक्तृत्व लक्षवेधी आहे. अभ्यासपूर्वक आणि आत्मविश्वासानं मुद्दे ...
जिल्हा परिषदेतील अजितराव घोरपडे गटाच्या शिक्षण व आरोग्य सभापती आशाताई पाटील यांचे वक्तृत्व लक्षवेधी आहे. अभ्यासपूर्वक आणि आत्मविश्वासानं मुद्दे मांडत असल्यानं त्या छाप पाडून जातात. बेरजेचं राजकारण करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नजरेतून असा कार्यकर्ता कसा सुटणार? सहा महिन्यांत जिल्हा परिषदेच्या तीन कार्यक्रमांमध्ये त्यांनी आशाताईंची भाषणं ऐकली. स्वत:च्या भाषणातील किमान पाच मिनिटं आशाताईंच्या कौतुकासाठी खर्ची घातली. शिवाय राष्ट्रवादी प्रवेशाची खुली ऑफरदेखील दिली. महिला पदाधिकारी असल्यानं मर्यादेचं भानही राखलं. इतका चांगला हिरा राष्ट्रवादीत का नाही, असा प्रश्न विचारला. त्यांच्या नावातच ‘आशा’ असल्याचंही ते म्हणाले. जयंतरावांची ही साखर पेरणी आता कितपत कामी येते हेच पाहायचं!
सर्वांनी उभे रहा!
सांगलीवाडीत कृष्णेकाठी जयंत रेस्क्यू फोर्सचा प्रारंभ पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नुकताच झाला. नदीकाठी कार्यक्रम असल्यानं नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. एरवी कार्यक्रमात भाषणावेळी ‘सर्वांनी बसून घ्या’ असे म्हणणाऱ्या जयंत पाटलांना या कार्यक्रमात मात्र ‘सर्वांनी उभे रहा’ असं म्हणण्याची वेळ आली. बसण्यासाठी खुर्च्या नसल्यानं उभे राहायला सांगत असल्याचा खुलासाही तत्परतेनं केला. त्यांची स्टाईल हास्याचे फवारे उडवणारी ठरली.
नेमेची येतो महापूर
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व आयुक्त नितीन कापडणीस या दोघांनाही दोन वर्षांपूर्वी सांगलीत रुजू होताच महापुराला तोंड द्यावं लागलं. पावसाळा म्हणजे सांगलीसाठी महापुराची तयारी हे एव्हाना ठरून गेलंय. त्यामुळं सांगलीकर ‘आता नेमेची येतो पावसाळा’ असं म्हणण्याऐवजी ‘नेमेची येतो महापूर’ असं म्हणू लागलेत. गेल्या आठवड्यात महापूर तयारीच्या एका बैठकीतही आयुक्तांच्या कामाचं कौतुक करताना लोकप्रतिनिधींनी नेमेची येणाऱ्या महापुराची आयुक्तांना आता सवय झालीय, असा उल्लेख केला. संकटालाही हसून सामोरं जाणाऱ्या सांगलीकरांची जिगर यातून दिसून आली.