पूरपट्ट्यामध्ये अम्युझमेंट पार्कचा घाट

By admin | Published: July 16, 2016 11:12 PM2016-07-16T23:12:49+5:302016-07-16T23:34:13+5:30

महापालिकेकडे प्रस्ताव : विरोधी राष्ट्रवादीस सत्ताधारी गटातूनही विरोध; पर्यायी जागा शोधण्याची सूचना

Whistle of Amusement Park in the floodplain | पूरपट्ट्यामध्ये अम्युझमेंट पार्कचा घाट

पूरपट्ट्यामध्ये अम्युझमेंट पार्कचा घाट

Next

सांगली : सांगलीच्या न्यू प्राईड थिएटरसमोर पूरपट्ट्यात येत असलेल्या खुल्या जागेत अम्युझमेंट पार्कचा घाट घातल्याची बाब महापालिकेच्या शनिवारी झालेल्या एका बैठकीत उघडकीस आली. राष्ट्रवादी, भाजप तसेच सत्ताधारी गटातीलच काही सदस्यांनी या गोष्टीला जोरदार विरोध केल्यानंतर याबाबत पर्यायी जागा शोधण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेत शनिवारी महापौर हारुण शिकलगार यांनी आयोजित केलेल्या नगरसेवक, अधिकाऱ्यांच्या बैठकीत एका बिल्डरने दिलेल्या अम्युझमेंट पार्कच्या प्रस्तावाचा विषय चर्चेला आला. वास्तविक बैठक ओपन जिमच्या (खुल्या व्यायामशाळा) विषयावर बोलावली असताना, अचानकपणे अम्युझमेंट पार्कचा विषय चर्चेला आल्याने नगरसेवकांना आश्चर्य वाटले. प्रस्तावाची सविस्तर माहिती समोर आल्यानंतर नगरसेवक संतापले. पूरपट्ट्यातच आठ एकर जागेवर हे उद्यान विकसित करण्याचा प्रस्तावात उल्लेख होता. गेल्या काही वर्षांपासून पूरपट्ट्यातील अनेक बांधकामे वादग्रस्त बनली आहेत. या बांधकामांमुळे शहराच्या गावठाणातील पाणी निचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पूरपट्ट्यात महापालिकेचेच उद्यान विकसित करण्याचा घाट घातला गेला आहे.
विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की, महापालिकेनेच अशापद्धतीने बेकायदेशीर बांधकाम केले, तर या परिसरात ज्यांचे प्लॉट आहेत, अशा लोकांना रितसर बांधकाम परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. उद्यान उभारण्यापेक्षा अशा लोकांची सोय करून देण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे पूरपट्ट्याशिवाय दुसऱ्या जागेचा प्रस्ताव का आला नाही, असा सवाल उपस्थित केला. राष्ट्रवादीचे नगरसेवक मैनुद्दीन बागवान, युवराज बावडेकर यांनीही या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. पूरपट्ट्यात आता कोणतेही बांधकाम करता येऊ शकते का, असा सवाल सदस्यांनी आयुक्तांसमोर उपस्थित केला.
गेल्या अनेक वर्षांपासून या पूरपट्ट्यात बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने परवान्यांचे वाटप झाले आहे. या गोष्टींमुळे शहरातील पुराचा धोका वाढला आहे. काही मोजक्या लोकांच्या सोयीसाठी शहराला वेठीस धरले जात असल्याची टीकाही राष्ट्रवादी सदस्यांनी यावेळी केली. यावेळी उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, सभागृह नेते किशोर जामदार, नगरसेवक उमेश पाटील, शेखर माने, विष्णू माने आदी नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)


प्रकल्पामागे हात : सत्ताधारी नगरसेवकांचा
पूरपट्ट्यात अशा पद्धतीचा प्रकल्प करून अन्य रद्द झालेली रेखांकने व बांधकाम परवाने रितसर मिळविण्याचा घाट घालण्यात सत्ताधाऱ्यांमधीलच एका गटाचा समावेश आहे. त्यांच्या विरोधातील सदस्यांना याची कल्पना आल्याने हा विषय हाणून पाडला. महासभेत पुन्हा हा विषय चर्चेला आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.


प्रकल्प करायचा असेल तर, पर्यायी जागा शोधा
अम्युझमेंट पार्कचा हा प्रकल्प प्रस्तावित करताना पूरपट्ट्यातीलच जागा कशी दर्शविण्यात आली? अन्य जागांचा पर्यायी विचार प्रस्तावात का झाला नाही? पूरपट्ट्यात कोणतेही बांधकाम करता येत नसल्याचे माहीत असूनही असा प्रस्ताव सादर कसा झाला? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले. प्रशासनाकडून याबाबत उत्तराची अपेक्षा काही सदस्यांनी व्यक्त केली. मात्र हा विषय कोणत्याही सभागृहाकडे आला नसल्याने प्रशासनाकडून त्याबाबत कोणताही खुलासा झाला नाही. सदस्य आक्रमक झाल्यानंतर पर्यायी जागेचा या प्रकल्पासाठी विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Whistle of Amusement Park in the floodplain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.