आता पांढरे रेशनकार्डधारकांनाही मिळणार 'आयुष्मान कार्ड'; ओमप्रकाश शेटे यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 04:58 PM2024-01-31T16:58:38+5:302024-01-31T16:59:07+5:30
आयुष्मान योजनेचे कार्ड काढण्यात शहरापेक्षा ग्रामीण भाग आघाडीवर
सांगली : केशरी, पिवळे रेशनकार्डधारकांना आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचा लाभ मिळत आहे. आता पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांनाही आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढता येणार आहे. या योजनेत सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ८९.४३ टक्के तर महापालिका क्षेत्रात ७२.५७ टक्के नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढले आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील नागरिक जागरूक असल्याचे दिसत आहे, अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर डॉ. शेटे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, केंद्र सरकारकडून 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' राबविली जात आहे. या योजनेतून लाभार्थ्याला पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. योजनेचा केसरी, पिवळ्या रेशनकार्डधारकांबरोबरच आता पांढरे रेशनकार्ड असणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. यामध्ये शासकीय नोकरदार असले तरीही ते आयुष्मान कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात.
आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी लाभ घ्यायचा काही नाही ते त्यांनी ठरवायचे आहे.
या योजनेत सांगली जिल्ह्यानेही आघाडी घेतली असून ८९.४३ टक्के नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढले आहे. शहरातील नागरिकांकडे सर्व सुविधा असतांनाही आयुष्मान कार्ड काढण्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. यामध्ये महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून १०० टक्के आयुष्मान कार्ड झाले पाहिजेत, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे डॉ. शेटे यांनी सांगितले.
राज्यात १३५० रुग्णालये
महाराष्ट्रात एक हजार ३५० रुग्णालयांमध्ये आयुष्मान कार्डधारकांना १०० टक्के मोफत उपचार मिळणार आहेत. काही रुग्णालयांच्या अडचणी असून त्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजची रक्कम पाच वर्षांत वाढविली नाही. यामध्ये वाढ करण्यासह योजनेचा अभ्यास करण्यासाठी १०२ डॉक्टरांचे राज्यात समिती गठीत केली आहे. समिती सखोल अभ्यास करून योजनेतील त्रुटी दूर करणार आहे, असेही डॉ. शेटे म्हणाले.
'सिव्हील'ची तपासणी करणार
सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयाचा कारभार समाधानकारक नाही. बैठकीलाही जिल्हा अधिष्ठातासह प्रमुख डॉक्टर गैरहजर होते. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून डॉ. शेटे यांनी 'सिव्हील'ला अचानक भेट देऊन पंचनामा करणार असल्याचे सांगितले.