राजू शेट्टी-जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? : भाजपच्या झेंड्याला ‘रयत’ची किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:52 PM2018-10-11T21:52:04+5:302018-10-11T21:55:42+5:30
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि इस्लामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? यावर भाजप-शिवसेनेकडून कोणालाही हिरवा कंदील मिळालेला नाही.
अशोक पाटील ।
इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि इस्लामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? यावर भाजप-शिवसेनेकडून कोणालाही हिरवा कंदील मिळालेला नाही. सध्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची नावे भाजपच्या श्रेष्ठींपुढे आहेत; तर व्यंकटेश्वरा शिक्षण संकुलाचे नेते राहुल महाडिक यांनी स्वबळावर शड्डू ठोकला आहे.
भाजपकडून वैभव नायकवडी यांनाही आमंत्रित करण्याचा डाव आखला जात आहे. एकूणच भाजपच्या झेंड्याला ‘रयत’ची किनार दिसत आहे.भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळणार, हे गृहीत धरूनच शिराळा मतदारसंघात भाजपची वाटचाल सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात ‘आमदार नाईक पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर’ या चर्चेला उधाण आले होते. यावर स्वत: शिवाजीराव नाईक यांनी पडदा टाकला आहे. आता तर त्यांनी हातकणंगलेतून भाजपचाच खासदार होणार, असे भाकीत करून भाजपवरील आपली निष्ठा दाखवून दिली आहे. परंतु खासदार शेट्टी यांच्याविरोधात कोण? यावर आमदार नाईक यांनी मौन पाळले आहे.
इस्लामपूर येथे महागाईविरोधात राष्ट्रवादीने काढलेला मोर्चा भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. इस्लामपूर नगरपालिकेत परिवर्तन झाले असले तरी, जयंत पाटील यांची ताकद आजही मतदारसंघात अभेद्य असल्याचे दिसते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपपुढे सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील यांची नावे असली तरी, महाडिक आणि हुतात्मा गटाची भूमिका आजही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार म्हणून एकमताने एकही नाव अद्याप पुढे आलेले नाही.
एकंदरीत जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात दौरा करताना आपले लक्ष आपल्या इस्लामपूर मतदारसंघावरही केंद्रित केले आहे. देशातील महागाईच्या विरोधातील पहिला मोर्चा इस्लामपूर येथे काढून राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली आहे. या मोर्चात सहभागी १० ते १२ हजार जनसमुदाय पाहून विरोधी भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
यापूर्वी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर येथे कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून आपली ताकद तपासली आहे. आता राष्ट्रवादीच्या या मोर्चाला भाजप काय प्रत्युत्तर देणार, याकडेच इस्लामपूरकरांचे लक्ष लागून आहे.