राष्ट्रवादीला बदनाम कोण करतंय..?

By admin | Published: February 29, 2016 12:08 AM2016-02-29T00:08:41+5:302016-02-29T00:51:29+5:30

इस्लामपूर पालिका : जयंत पाटील यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये झाली खडाजंगी

Who is a bad name for NCP? | राष्ट्रवादीला बदनाम कोण करतंय..?

राष्ट्रवादीला बदनाम कोण करतंय..?

Next

अशोक पाटील-- इस्लामपूर --गेल्या २५ वर्षांपासून इस्लामपूर पालिकेवर आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांची सत्ता आहे. या सत्ताधाऱ्यांतच नेहमीच अंतर्गत कुरघोड्या सुरूअसतात. त्यामुळे आता पालिकेच्या कामकाजात स्वत: जयंत पाटील यांनी लक्ष घातले आहे. त्यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष संजय कोरे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यामध्ये राष्ट्रवादीला बदनाम कोण करतंय? या विषयावरून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ महिन्यांपासून पालिकेच्या पक्षबैठकीला स्वत: आमदार जयंत पाटील उपस्थित राहत आहेत. पालिकेच्या अर्थसंकल्पाची माहिती घेण्यासाठी जयंत पाटील यांनी दोन बैठका घेतल्या. पहिली बैठक २५ मार्च रोजी ज्ञानप्रबोधिनी येथे झाली. या बैठकीस सर्वच नगरसेवकांना आमंत्रित केले होते. परंतु ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे या बैठकीस उपस्थित नव्हते.
त्यामुळे कोणतीही चर्चा न होता तयार केलेल्या अर्थसंकल्पाच्या प्रती उपस्थित नगरसेवकांना देण्यात आल्या. यावेळी जयंत पाटील यांनी चर्चा करण्यासाठी २६ रोजी कारखाना कार्यस्थळावर ठराविक नगरसेवकांना आमंत्रित करून दुसऱ्या बैठकीचे नियोजन केले.
या बैठकीस पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष संजय कोरे, बी. ए. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांच्यासह पालिकेतील संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या समारोपावेळी शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांचा प्रवेश झाला. त्यावेळी जयंत पाटील यांच्यासमोर पालिकेच्या राजकारणात एकदिलाने कार्यरतपणाचा दिखावूपणा करणारे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि उपनगराध्यक्ष संजय कोरे यांच्यामध्ये उपनगरांतील विकास कामांबाबत शाब्दिक चकमक झाली.
यामुळे शहाजी पाटील यांनी अचानक संजय कोरे यांना टार्गेट करत, आपण राष्ट्रवादीला बदनाम करताय, असा आरोप केला. यावर संजय कोरे यांनी, आपण शहराध्यक्ष झाल्यापासून राष्ट्रवादी बदनाम होत असल्याचा प्रतिआरोप केला. यामुळे दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यावर जयंत पाटील यांनी मौन पाळत बैठकीतून निघून जाणे पसंत केले.
याबाबत कोरे आणि पाटील यांना विचारले असता, त्यांनी याला दबकत दबकत दुजोरा दिला.


पालिकेत तीन वेगवेगळे गट कार्यरत
पालिकेत पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांचे वेगवेगळे गट कार्यरत आहेत. अलीकडील काळात तीन भाऊ एकमेकांच्या सल्ल्याने राजकारण करत आहेत, तर एन. ए. गु्रपचे नाना जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे भूमिका बजावत आहेत. या तिघांनीही आपल्या भूतकाळात डोकावून पाहावे, म्हणजे विकास नेमका कोणाचा झाला हे समजेल, अशी चर्चा सर्वसामान्यांतून आहे.

गेल्या २५ वर्षांतील पालिकेचे राजकारण पाहता, सभागृहात जवळ-जवळ तेच चेहरे आहेत. जे राजकारणातून बाहेर पडले, त्यांची अवस्था दयनीय आहे. यामध्ये काही कर्जबाजारी झाले, तर काही राजकारणातून हद्दपार झाले आहेत. पालिकेतील प्रशासनाचा अनुभव व अभ्यास असणारे ४ ते ५ नगरसेवक वजा करता, बाकी सर्व नगरसेवक केवळ हात वर करणारे आहेत.

Web Title: Who is a bad name for NCP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.