मृतदेहाच्या गोंधळामागे कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:01 AM2018-06-22T00:01:07+5:302018-06-22T00:01:07+5:30
सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) जिवंत रुग्णाला मृत ठरविण्यामागे नेमका कोणाचा हात? अशी चर्चा रंगू लागली आहे. मृतदेह शवागृहात नेण्यापूर्वी कर्मचाऱ्याकडून मृताच्या कपाळावर त्याच्या नावाची चिठ्ठी चिकटविली जाते; पण चिठ्ठी चिकटविणाºया कर्मचाºयाने अविनाश बागवडे यांच्या नावाची चिठ्ठी बनवून बेवारस मृतदेहाच्या कपाळावर चिकटविल्याने मृतदेह अदला-बदलीचा घोळ झाला आहे.
वॉर्डातील रुग्णाचा मृत्यू होण्यापूर्वीच कर्मचाºयांकडून रुग्णवाहिकाचालकांना माहिती दिली जाते. रुग्णवाहिकाचालक तातडीने रुग्णालयात येतात. तोपर्यंत रुग्ण दगावलेला असतो. मग रुग्णवाहिकाचालक मृत रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन मृतदेह नेण्याचे भाडे ठरवितात. या बदल्यात ते वॉर्डातील कर्मचाºयांना घसघशीत कमिशन देतात. गेल्या अनेक वर्षांपासून काही रुग्णवाहिका चालकांचे कर्मचाºयांशी कमिशनच्या टक्केवारीचे संबंध जोडले गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी मृतदेह अदला-बदल करण्यामागेही कर्मचाºयाची कमिशन मिळविण्याची धडपडही कारणीभूत ठरली असल्याची चर्चा आहे.
‘सिव्हिल’च्या संसर्गजन्य विभागात मृतदेह अदला-बदल होण्याचा घडलेला प्रकार फारच गंभीर आहे. हा वॉर्ड ‘सिव्हिल’पासून विभक्त आहे. रुग्णांची संख्या अत्यंत कमी असते. त्यामुळे डॉक्टर फारसे या वॉर्डाकडे फिरकत नसल्याने कर्मचारी म्हणेल तोच कारभार चालतो. अविनाश बागवडे यांच्या कॉटला लागूनच बेवारस रुग्ण उपचार घेत होता. मध्यरात्री अडीच वाजता डॉक्टरांनी बेवारस रुग्णाला मृत जाहीर केले.
त्यानंतर या मृतदेहाच्या कपाळावर त्याच्या नावाची चिठ्ठी चिकटविणे, उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवागृहात नेण्याची जबाबदारी कर्मचाºयांची असते. पण कर्मचाºयाने बेवारस मृतदेहाच्या कपाळावर अविनाश बागवडे यांच्या नावाची चिठ्ठी चिकटविली. त्याच्या या घोळामुळे डॉक्टर, पोलीस व बागवडे यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला.
मृतदेहाच्या कपाळावर चिठ्ठी चिकटविणारा हा कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. तरीही त्याच्याकडून एवढी मोठी चूक कशी झाली? ही चूक करण्यामागे तो शुद्धीवर नव्हता का? अशी खुद्द कर्मचाºयांमध्येच चर्चा सुरू आहे. डॉक्टरानीही पुढे तपासणी करायला हवी होती.
डॉक्टर व कर्मचाºयाने दिलेल्या माहितीच्याआधारे आकस्मिक दुर्घटना विभागातील वैद्यकीय अधिकाºयांनी उत्तरीय तपासणीची व पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया पार पाडली. रुग्ण डॉक्टरांनी मृत घोषित केला की, तातडीने कमिशनसाठी रुग्णवाहिक चालकाशी संपर्क साधण्याची काही कर्मचाºयांना घाईगडबड झालेली असते. या प्रकरणातही केलेली घाईगडबड रुग्णालय प्रशासनाच्या चांगलीच अंगलट आली आहे.
तपासणी झाली : तरीही केसपेपरचा घोळ
बागवडे यांना कर्मचाºयाने मृत ठरविले; पण प्रत्यक्षात बागवडे वॉर्डात जिवंत होते. वरिष्ठांनी ते मृत झाल्याचे प्रमाणपत्र बनविले. ही सर्व कागदपत्रे रंगविण्याची प्रक्रिया सुरू असताना वॉर्डातील डॉक्टरांना व अन्य कर्मचाºयांना जराही या घोळाची कल्पना नसावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बागवडे मृत झाले म्हणून त्यानंतर जी पुढील प्रक्रिया राबविली गेली, त्यांचा केसपेपर हलविला, परंतु सकाळी डॉक्टरांनी वॉर्डास भेट दिल्यानंतर रुग्णांची तपासणी करतानाही हा घोळ कसा लक्षात आला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.