अनधिकृतपणे डिस्टिलरी चालवणाऱ्या ‘स्वप्नपूर्ती’चा फायदा कोणाला?, जयंत पाटलांकडून विशाल पाटील ‘टार्गेट’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 05:20 PM2023-03-21T17:20:11+5:302023-03-21T17:20:47+5:30

याप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आश्वासन दिले

Who benefits from Swapnapurti who runs an unauthorized distillery, Vishal Patil Target by Jayant Patil | अनधिकृतपणे डिस्टिलरी चालवणाऱ्या ‘स्वप्नपूर्ती’चा फायदा कोणाला?, जयंत पाटलांकडून विशाल पाटील ‘टार्गेट’ 

अनधिकृतपणे डिस्टिलरी चालवणाऱ्या ‘स्वप्नपूर्ती’चा फायदा कोणाला?, जयंत पाटलांकडून विशाल पाटील ‘टार्गेट’ 

googlenewsNext

सांगली : कृष्णा नदीतील माशांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडली. वसंतदादा साखर कारखान्याची डिस्टिलरी स्वप्नपूर्ती शुगरकडून अनधिकृतपणे चालविली जात होती. त्यांच्यावर काय कारवाई करणार? डिस्टिलरीच्या माध्यमातून कोणाला फायदा होत होता, अशा प्रश्नांचा भडीमार करीत वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. याप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आश्वासन दिले.

दोन आठवड्यांपूर्वी कृष्णा नदीतील लाखो मासे मृत झाले. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाहणी करून वसंतदादा साखर कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया कंपनी व स्वप्नपूर्ती डिस्टिलरीला नोटीस बजावली होती. ती डिस्टिलरी चालवणारी स्वप्नपूर्ती शुगर ही विशाल पाटील यांच्याशी संबंधित कंपनी आहे. या डिस्टिलरीची पाईप फुटून मळीमिश्रित पाणी नदीपात्रात मिसळल्याने मासे मृत झाल्याचा अहवालही प्रदूषण मंडळाने दिला होता. त्यानंतर साखर कारखाना व डिस्टिलरी बंद करण्यात आली. त्यांचा वीज व पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.

याप्रश्नी जयंत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. ते म्हणाले की, वसंतदादा कारखाना दत्त इंडिया कंपनीला चालविण्यास दिला आहे. पण कारखान्याची डिस्टिलरी स्वप्नपूर्ती शुगरकडे असल्याचे दिसून येते. वास्तविक जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वप्नपूर्ती शुगरशी डिस्टिलरीबाबत कसलाही करार केलेला नाही. त्यामुळे स्वप्नपूर्तीकडून डिस्टिलरी अनधिकृतपणे चालविली जात होती. त्यांच्यावर काय कारवाई करणार? ही डिस्टिलरी किती वर्षे सुरू आहे? त्याचा फायदा कोण घेत आहे? याचीही चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर वनमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले.

महापालिका शुद्धीकरण प्रकल्पासाठी ६२ कोटी

महापालिकेच्या शेरीनाल्याचे दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळते. शेरीनाल्यावर शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी ६२ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. कृष्णा नदीत मासे मृत झाल्यानंतर शासनालाही जाग आली. विधानसभेत लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीपीसाठी ६२ कोटी देणार असल्याचे जाहीर केले.

Web Title: Who benefits from Swapnapurti who runs an unauthorized distillery, Vishal Patil Target by Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.