कवठेमहांकाळचे सभापती कोण?
By admin | Published: February 27, 2017 11:41 PM2017-02-27T23:41:34+5:302017-02-27T23:41:34+5:30
तालुक्यात चर्चा : मनोहर पाटील, मदन पाटील यांची नावे आघाडीवर
लखन घोरपडे ल्ल देशिंग
कवठेमहांकाळ पंचायत समितीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत सोळा जणांनी सभापतीपद भूषविले आहे. आता सतरावा सभापती कोण असणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पंचायत समिती स्थापनेपासूनच्या बावन्न वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत सोळा जणांना सभापती पदाची संधी मिळाली आहे. पंचायत समितीची पहिली पंचवार्षिक निवडणूक १९६५ मध्ये झाली. यावेळी पहिले सभापती म्हणून माधवराव शिंदे यांना संधी मिळाली, तर दुसऱ्यावेळी १९६७ मध्ये गणपतराव ओलेकर यांनी सर्वाधिक सलग बारा वर्षे सभापतीपद भूषविले.
त्यानंतर नानासाहेब सगरे यांना १९७९ ते ९० असा सलग अकरा वर्षे हे पद भूषविण्याचा मान मिळाला. त्यानंतर मात्र पंचायत समितीवर दोन वर्षे प्रशासकाची नेमणूक झाली.
पुन्हा १९९२ नंतर अजितराव घोरपडे यांना तीन वर्षे सभापतीपद भूषविण्याची संधी मिळाली, तर पंडितराव जगदाळे यांची दहा महिने प्रभारी सभापती म्हणून नेमणूक झाली.
पंचायत समितीच्या स्थापनेच्या तब्बल ३२ वर्षांनंतर १९९६ मध्ये सुमनताई नारायण पाटील यांना पहिल्या महिला सभापती होण्याचा मान मिळाला. यात आतापर्यंत केवळ चारच महिलांनी सभापतीपद भूषविले आहे.
पाटील यांच्यानंतर विलास पवार यांनी आठ महिने, अजित कारंडे यांनी एक वर्ष, तर विमल बंडगर यांनी तीन वर्षे सभापती म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर सत्तार तांबोळी तीन वर्षे, चंद्रकांत हाक्के दोन वर्षे, जालिंदर देसाई, मदन पाटील हे प्रत्येकी अडीच वर्षे सभापती होते. त्यानंतर महिला गटातून सुरेखा कोळेकर, वैशाली पाटील यांनी अडीच वर्ष हे पद पटकाविले. यांच्यासह आतापर्यंत सोळा जणांना सभापती पदाचा बहुमान मिळाला आहे. आता सतरावा सभापती कोण होणार, याकडे तालुक्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
अजितराव घोरपडे : सभापती ते मंत्री
अनेक तालुक्यांमधून पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले की लगेच काहींनी राज्याच्या मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे, तर काहीजण आमदार, खासदार झाले आहेत. मात्र कवठेमहांकाळ तालुक्यातून केवळ अजितराव घोरपडे यांचा पंचायत समितीचे सभापती ते थेट मंत्री असा, थक्क करणारा राजकीय प्रवास झाला आहे.
मनोहर पाटील यांना
संधी मिळणार ?
नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी विकास आघाडीची एकहाती सत्ता आली आहे. त्यातच सभापतीपद खुले आहे. कुची, देशिंग, कोकळे हे तीन गण सर्वसाधारण असल्याने येथून मदन पाटील, मनोहर पाटील हे विजयी झाले आहेत. त्यामुळे या दोघांचीही नावे सभापती पदासाठी चर्चेत आहेत. परंतु मदन पाटील यांनी यापूर्वी पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले आहे. त्यामुळे यावेळी देशिंग गणातून विजयी झालेले मनोहर पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.