सांगली महापालिकेवर झेंडा कोणाचा? आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:04 AM2018-08-03T00:04:09+5:302018-08-03T00:04:14+5:30
सांगली : राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी मतमोजणी होत आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील शासकीय गोदामात सकाळी दहापासून मतमोजणीला सुरुवात होईल. महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, हे दुपारी एकपर्यंत स्पष्ट होणार आहे.
महापालिकेच्या २० प्रभागातील ७८ जागांसाठी बुधवारी ६२.१५ टक्के मतदान झाले. ४५१ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या प्रमुख चार पक्षांसह स्थानिक आघाड्या व अपक्षांनी गेले महिनाभर प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली आहे, तर भाजप व शिवसेना स्वतंत्ररित्या लढत आहेत. काँग्रेस ४५, तर राष्टÑवादी ३४ जागांवर लढत आहे. त्यातील पाच जागांवर मैत्रिपूर्ण लढत होत आहे, तर या आघाडीने चार जागा अपक्षांसाठी सोडल्या आहेत. भाजपने पहिल्यांदाच सर्वच्या सर्व ७८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना ५१ जागा लढवित असून, सात उमेदवारांना त्यांनी पुरस्कृत केले आहे. याशिवाय शहर सुधार समितीचे १५, एमआयएमचे ८, स्वाभिमानी विकास आघाडीचे ९ उमेदवार आणि लोकशाही आघाडी, अपक्ष महाआघाडीही रिंगणात आहे.
प्रचाराच्या काळात आरोप-प्रत्यारोपांनी निवडणुकीत रंगत आली होती. काँग्रेस व राष्ट्रवादीने भाजपला ‘टार्गेट’ केले होते, तर भाजपने दोन्ही काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. शहराच्या विकासापेक्षा देश व राज्याच्या कारभारावरच प्रचारात भर होता. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचे राज्यपातळीवरील नेते, मंत्री, आमदार, खासदारांनी प्रचारात भाग घेतला होता. आता मतदानानंतर मात्र सारेच राजकीय पक्ष सत्तेचा दावा करीत आहेत. स्थानिक आघाड्या व अपक्षांनी तर, आमच्याशिवाय महापौर होणार नाही, असा दावा करण्यास सुरुवात केली आहे. दावे-प्रतिदावे केले जात असले तरी, महापालिकेवर झेंडा कुणाचा, हे शुक्रवारी निकालानंतरच स्पष्ट होईल.
दरम्यान, प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील शासकीय गोदामात सकाळी दहा वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. सांगली, कुपवाड या दोन शहरातील १३ प्रभागांची मतमोजणी एका हॉलमध्ये, तर मिरजेतील सात प्रभागांची मतमोजणी दुसऱ्या हॉलमध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी बारा टेबल असतील. त्यासाठी ३३४ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्या प्रभागात पोस्टल मतपत्रिका आल्या आहेत, त्या मतपत्रिका आधी मोजण्यात येणार आहेत. नंतर मग एक-एक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे खुली केली जातील. यंदा चारसदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने प्रत्येक प्रभागाची मतमोजणी साधारणपणे पाऊण तासात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
महापालिकेची निवडणूक राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनविली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेत्यांनी प्रचारात भाग घेत रान उठविले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आ. विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील, शिवसेनेचे खा. गजानन कीर्तीकर, नितीन बानुगडे-पाटील या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरेही...
गुरुवारी दिवसभर शासकीय गोदामात मतमोजणीच्या तयारीचे काम सुरू होते. इमारतीत टेलिफोन, इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी मीडिया सेल सुरू करण्यात आला आहे. मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे याठिकाणी आणण्यात आली. त्यामुळे या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तेथे कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे.
काँग्रेस आघाडी की भाजप?
महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी की भाजप सत्तेत येणार, याची चर्चा शहरात रंगली आहे. कोणाला स्पष्ट बहुमत मिळणार, अपक्षांची भूमिका काय राहणार, स्वाभिमानी आघाडीला किती जागा मिळणार, अशा अनेक मुद्यांवर पैजाही लागल्या आहेत. बहुमत न मिळाल्यास अपक्ष, स्थानिक आघाड्या कोणासोबत राहणार, याची चर्चा सुरू आहे.
दहा वाजता सुरू होणार मतमोजणी
सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी तीनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
मतमोजणीसाठी ३३४ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सहा विभागीय निवडणूक कार्यालय आहेत. त्या प्रत्येक कार्यालयाकडील प्रभागाच्या मतमोजणीसाठी १२ टेबलची व्यवस्था केली आहे.