शरद पवार आता भूकंप करू शकत नाहीत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

By शीतल पाटील | Published: April 21, 2023 05:40 PM2023-04-21T17:40:50+5:302023-04-21T18:13:47+5:30

अजित पवार भाजपच्या निकषात बसले पाहिजेत

Who is Sanjay Raut? I don't know them, Union Minister Narayan Rane reaction to Sanjay Raut damages claim | शरद पवार आता भूकंप करू शकत नाहीत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

शरद पवार आता भूकंप करू शकत नाहीत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

googlenewsNext

सांगली : ‘कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही’, असे सांगत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी अब्रुनुकसानीच्या दाव्याबाबत फटकारले. ‘भांडूपच्या सभेत मी तसे काही बोललोच नाही’, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. त्यामुळे राऊत-राणे वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय मंत्री राणे शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. शिवसेनेत असताना संजय राऊत यांना निवडून आणण्यासाठी खर्च केल्याचे वक्तव्य त्यांनी भांडूपच्या सभेत केले होते. या वक्तव्याविरोधात राऊत यांनी मुलुंड न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याबाबत राणे म्हणाले की, कोण आहे संजय राऊत? मी ओळखत नाही. भांडूपच्या सभेत मी असे बोललोच नाही.

ते म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. शरद पवार आता भूकंप करू शकत नाहीत. राज्यातील शिंदे-भाजपचे सरकार भक्कम आहे. ते पाच वर्षे टिकेल. राज्यातील सरकार चांगले काम करीत आहे.

लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत भाजपने ४०३ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. माझ्याकडे दक्षिण गोवा, दक्षिण मुंबई व सांगली लोकसभेची जबाबदारी आहे. गतवेळेपेक्षा सांगलीचा खासदार तीन लाख मतांनी विजयी होईल. एकसंघ व एक विचाराने भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय, विविध योजना, भाजपचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्ते करणार आहेत. २०३० पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४६, तर विधानसभेच्या १९० जागा भाजप जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.

सांगली जिल्ह्यातील शेतीमाल, उपपदार्थ निर्यात व्हावे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सांगलीचा बेदाणा व विमानतळाबाबत भाजपच्या बैठकीत चर्चा झाली आहे. या दोन्हीबाबत लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

अजित पवारांची भेट नाही

अजित पवार यांच्या राजकीय हालचालीबाबत राणे म्हणाले की, काही महिन्यांपासून त्यांची भेट झालेली नाही. दूरध्वनी झाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय चालले आहे, हे माहीत नाही. त्यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही, हे वरिष्ठ नेते बघतील, तपासून घेतील. तेही भाजपच्या निकषात बसले पाहिजेत.

Web Title: Who is Sanjay Raut? I don't know them, Union Minister Narayan Rane reaction to Sanjay Raut damages claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.