सांगलीतील इस्लामपूर, शिराळ्यामध्ये भाजपचा गॉडफादर कोण?, निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपलाच मिळणार असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 02:09 PM2023-01-27T14:09:45+5:302023-01-27T14:21:41+5:30
२०२४ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपलाच मिळणार, असा दावा
अशोक पाटील
इस्लामपूर : माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना भाजपने दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन पाळले नाही. अखेर नाईक यांनी भाजपला रामराम ठोकला. आता इस्लामपूर, शिराळा मतदारसंघात भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांना २०२४ च्या रणांगणात उतरण्यासाठी वरिष्ठ नेते आश्वासन देत आहेत. या दोन्ही मतदारसंघात भाजपचा गॉडफादर कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांना अखेरपर्यंत मंत्रिपद दिलेच नाही. त्यामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले.
गत विधानसभा निवडणुकीत महाडिक गटाचे उमेदवार सम्राट महाडिक यांनी ५० हजारांहून अधिक मतदान मिळवून ताकद दाखविली. म्हणूनच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाडिक यांना २०२४ च्या विधानसभेच्या तिकिटासाठी ग्वाही दिल्याचे महाडिक समर्थक मानतात. परंतु पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शिराळा मतदारसंघात येऊन सत्यजित देशमुख यांनाच २०२४ ची उमेदवारी मिळेल, असे जाहीर करून देशमुख -महाडिक समर्थकांत संभ्रम निर्माण केला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांना गत इस्लामपूर मतदारसंघ निवडणुकीत भाजपची उमेदवारी देणार म्हणून वरिष्ठ नेत्यांनी आश्वासन दिले होते. परंतु युतीत हा मतदारसंघ शिवसेनेला गेल्याने पाटील यांना बंडखोरी करावी लागली.
२०२४ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपलाच मिळणार, असा दावा त्यांचे कार्यकर्ते करतात. त्यामुळेच निशिकांत पाटील आतापासूनच विधानसभेची तयारी करत आहेत. नव्या युतीत इस्लामपूर मतदारसंघ कोणाकडे जाणार, यावर प्रश्नचिन्ह आहे. तरीही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. दोन्ही मतदारसंघात गॉडफादर नसल्याने भाजपची राष्ट्रवादीपुढे फरफट होत चालली आहे.
एकनाथ शिंदे यांचे पवारांना पाठबळ
जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचे गॉडफादर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे पवार यांनी गॉडफादरच्या ताकदीवर इस्लामपूर मतदारसंघावर दावा केला आहे.