शहरातील बेवारस वाहनांचे मालक कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:25 AM2021-03-06T04:25:17+5:302021-03-06T04:25:17+5:30
सांगली : शहरातील महत्त्वाचे रस्ते, रहिवासी क्षेत्रात वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या बेवारस ...
सांगली : शहरातील महत्त्वाचे रस्ते, रहिवासी क्षेत्रात वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या बेवारस वाहनांविरोधात महापालिकेने जप्तीची कारवाई हाती घेतली आहे. महापालिकेने आतापर्यंत ८२ वाहने जप्त केली आहेत, तर केवळ १४ वाहनांच्या मालकांनी दंड भरून ती परत नेली. उर्वरित वाहने अजूनही महापालिकेच्या ताब्यात आहेत. या बेवारस वाहनांचे मालक कोण? असा प्रश्न पडला आहे.
शहरातील अनेक भागात बेवारस वाहनांची संख्या मोठी आहे. ही वाहने सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहेत. अरुंद रस्ते, गल्ली-बोळातही बेवारस स्थितीत वाहने वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे होतात. शिवाय पावसाळ्यात अशा वाहनांत डेंग्यू व इतर आजाराचे डास वाढत असतात. या बेवारस वाहनांचा गुन्हेगारी कृत्यासाठीही वापर होऊ शकतो. त्यामुळे ही वाहने रस्त्यावरून उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत होती.
महापालिकेनेही बेवारस वाहने जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत ८२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. यात दुचाकी, चारचाकी, तीनचाकी, सहाचाकी वाहनांचा समावेश आहे. जेसीबी, क्रेनच्या साहाय्याने ही वाहने उचलून खुल्या भूखंडात ठेवली आहेत. तरीही वाहनमालकांकडून ही वाहने परत नेण्याबाबत टोलवाटोलवी सुरू असते.
चौकट
महापालिका प्रशासन काय म्हणते?
१. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने चारही प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रातील बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आधी वाहनमालकांना पालिकेकडून नोटिसा बजाविल्या जातात. त्यानंतरही त्याने वाहन हटविले नाही, तर ते जप्त केले जाते.
२. आतापर्यंत ८० हून अधिक वाहने जप्त केली आहेत. ही वाहने दंड भरून परत केली जात आहेत. आतापर्यंत १४ वाहने परत करण्यात आली आहेत. नागरिकांनी बेवारस वाहन आढळल्यास महापालिकेला माहिती द्यावी, असे आवाहन उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले.
चौकट
पोलीस अधिकारी काय म्हणतात?
शहरात वाहतुकीला अडथळे होणारी वाहने वाहतूक शाखेच्यावतीने हटविली जातात. ही वाहने जप्त करून वाहतूक शाखेच्या कार्यालय आणतो. वाहनमालकांकडून दंड घेऊन ती परत केली जातात. शहरात अन्य ठिकाणी धूळ खात पडलेल्या वाहनांवर कारवाईचे अधिकार महापालिकेला आहेत. त्यानुसार महापालिकेने वाहन जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. त्याला वाहतूक शाखेनेही सहकार्य केले आहे, असे वाहतूक शाखेच्या निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी सांगितले.
चौकट
नागरिकांची प्रतिक्रिया
१. खणभाग परिसरात रस्त्याच्या कडेला बेवारस वाहने होती. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर आता ती जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वी कुणाकडे तक्रार करायची? असा प्रश्न होता. महापालिकेलाही कळविले होते. पण कारवाई झाली नव्हती.
- प्रदीप कांबळे
२. शंभरफुटी रस्त्यावर दुरुस्तीसाठी आलेली अनेक वाहने वर्षानुवर्षे रस्त्याच्या कडेला होती. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली होती. ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहिल्यास वाहतुकीला अडथळे कमी होतील.
- संदीप दळवी
३. जप्त वाहनांचा तपशील
दुचाकी : १९
तीनचाकी : ११
चारचाकी : ४६
सहाचाकी : ६
परत नेलेली वाहने
दुचाकी : १
चारचाकी : १३
दंड वसूल : ४९.५०० रुपये