‘त्या’ आठ गावांत सत्ता कुणाची ?
By admin | Published: November 20, 2015 11:44 PM2015-11-20T23:44:59+5:302015-11-21T00:28:50+5:30
जाहीर भूमिकेची अपेक्षा : कारभाऱ्यांसाठी नेत्यांची चढाओढ
दत्ता पाटील- तासगाव तालुक्यातील ३९ पैकी राष्ट्रवादीने २५, तर भाजपने २२ गावांवर वर्चस्वाचा दावा केला. या दाव्यात आठ ग्रामपंचायतींबाबत दोन्ही नेत्यांकडून हिशेब मांडला जात आहे. त्यामुळेच दोन्हीकडून वर्चस्वाचा दावा करुनही, नेमके वर्चस्व कोणाचे? या प्रश्नाचे उत्तर झाकोळले गेले आहे. या आठ गावांच्या कारभाऱ्यांनी नेतृत्वाबाबत भूमिका केली, तर नेतृत्वाबाबतीत ‘दूध का दूध’ होऊन तालुक्यावर कोणाचे वर्चस्व, याचा फैसला होणार आहे.
तासगाव तालुक्यावर वर्चस्व कोणाचे? या एकाच प्रश्नाने गेल्या काही महिन्यांंपासून तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतरही वर्चस्वाचा तिढा सुटला नाही. त्यामुुळे या गावातील सरपंच आपल्याकडे आल्यानंतर पुन्हा वर्चस्व दाखवून देण्याची संधी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी साधली. मात्र तरीदेखील निर्भेळ वर्चस्वाचा दावा झालाच नाही. राष्ट्रवादीने २५, तर भाजपने २२ गावांवर दावा केला. मात्र दोन्ही पक्षांकडे आठ ग्रामपंचायती समान होत्या. या आठ गावांमुळे वर्चस्वाचा तिढा कायम राहिला आहे. या गावांसाठी दोन्ही गटांकडून अजूनही चढाओढ सुरु आहे. या गावांच्या कारभाऱ्यांनी नेतृत्वाची भूमिका जाहीर केली, तर वर्चस्वाचा फैसला होणार आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी तालुक्यावर एकहाती वर्चस्व मिळविण्याचा, तर राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांनी वर्चस्व कायम ठेवण्याचा चंग बांधला आहे. दोन्ही नेत्यांच्या या मनसुब्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका चर्चेचा विषय ठरल्या. इतकेच नाही, तर सरपंच निवडीही उत्सुकतेचा विषय ठरल्या. या निवडीनंतर वर्चस्वाचे फलित साध्य करण्यासाठी खासदार संजयकाका आणि आमदार सुमनताई यांनी व्यूहरचना कायम ठेवली. खासदारांनी २२ गावांत आपलेच समर्थक कारभारी झाल्याचा दावा केला. आमदारांनी २५ गावांवर दावा केला. दोन्ही नेत्यांची बेरीज निवडणूक झालेल्या गावांपेक्षा जादाच झाली.
दोन्ही नेत्यांनी आठ गावे आपलीच असल्याचा दावा केला. ही आठ गावे वगळली, तर राष्ट्रवादीसाठी निर्विवाद वर्चस्व असलेली १७, तर भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेली १४ गावे आहेत. मात्र अन्य आठ गावांची नेमकी भूमिका स्पष्ट होत नसल्यामुळे, किंबहुना दोन्ही नेत्यांना ही गावे आपलीशी वाटत असल्यामुळे वर्चस्वाचा तिढा कायम आहे. हा तिढा सोडवायचा असेल, तर या आठ गावांच्या कारभाऱ्यांनी, नेतृत्व कोणाचे स्वीकारणार? याबाबत भूमिका जाहीर करण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच तालुक्यावर वर्चस्व कोणाचे? याचा फैसला होणार आहे.
तिढा सुटता सुटेना : होऊन जाऊ दे एकदा...
आठ ग्रामपंचायतींवर भाजप आणि राष्ट्रवादीने दावेदारी सांगितली आहे. या आठ गावांची बेरीज आणि वजाबाकीच दोन्ही पक्षांच्या वर्चस्वाचे भवितव्य ठरवणार आहे. मात्र यातील बहुतांश गावांतील कारभाऱ्यांची संदिग्ध भूमिका असल्यामुळे नेत्यांना वर्चस्ववादाची बाधा झाली आहे. आठपैकी बहुतांश गावांत दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांत गोंधळ झाला आहे. त्यामुळे नेमकी कोणती भूमिका घ्यायची, याबाबत कारभारी संदिग्ध आहेत. विजयी उमेदवार सकाळी भाजपच्या, तर सायंकाळी राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेत्यांतही त्यांच्याबाबत संभ्रम असला तरी, वर्चस्वाचा घोडा दामटला जात असल्याचे चित्र आहे.
‘या’ आठ गावांसाठी सुरू आहे ‘कल्ला’
निंंबळक, धामणी, विजयनगर, नरसेवाडी, लोढे, जुळेवाडी, गौरगाव, डोर्ली.
आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर कार्यकर्ते अद्यापही सावध भूमिकेत असल्याने उघड बाजू घेत नसल्याचे चित्र आहे.