शेगाव गटाचा चकवा यंदा कोणाला?

By admin | Published: January 30, 2017 11:40 PM2017-01-30T23:40:05+5:302017-01-30T23:40:05+5:30

महिला आरक्षण : वसंतदादा विकास आघाडी-राष्ट्रवादीचे काँग्रेस, भाजपसमोर तगडे आव्हान

Who is Shegaon Group Chakra? | शेगाव गटाचा चकवा यंदा कोणाला?

शेगाव गटाचा चकवा यंदा कोणाला?

Next



भागवत काटकर ल्ल शेगाव
जत उत्तर भागातील शेगाव जिल्हा परिषद गट व कोसारी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलांसाठी खुला झाला असून, शेगाव पंचायत समिती गण खुला झाला आहे. या गटात गेल्या १५ वर्षांपासून अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या असून, भल्या-भल्यांना या गटाचा अंदाज चकवा देतो. यंदा वसंतदादा विकास आघाडी व राष्ट्रवादीच्या युतीने कॉँग्रेस व भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.
शेगाव गणातील बेवनूर गाव आता कोसारीत समाविष्ट झाले आहे. कंठी गाव डफळापूर जिल्हा परिषद गटात, तर वाषाण गाव मुचंडी गटात समाविष्ट झाले आहे. मागीलवेळी कंठी, वाषाण ही दोन गावे शेगावमध्ये होती. पुनर्रचित १५ गावांच्या शेगाव गटाची निर्मिती झाली आहे.
शेगाव गटात भाजपचे आ. विलासराव जगताप, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, कॉँग्रेसचे विक्रमसिंह सावंत, रासपचे जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांना मानणारे समर्थक आहेत. उमेदवार निश्चित करण्यासाठी सर्वांनीच गटवार बैठका घेतल्या आहेत. या गटावर दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते भाजपवासी झाल्याने या पक्षाने अंतिमक्षणी सुरेश शिंदे यांच्या वसंतदादा विकास आघाडीशी युती केली आहे. त्यामुळे थेट तिरंगी सामना होणार आहे.
शेगाव जिल्हा परिषद गटासाठी भाजपकडून सर्वसाधारण गटातील महिलांसाठी अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रभाकर जाधव यांच्या पत्नी सौ. स्नेहलता जाधव यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. कॉँग्रेसकडून सौ. वर्षा महादेव साळुंखे (शेगाव), सौ. वर्षाराणी दामोदर शिंदे, सौ. शुभांगी प्रतीक जाधव इच्छुक असल्या तरी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास ऊर्फ प्रकाश भोसले यांच्या पत्नी सौ. विजया भोसले यांची उमेदवारी कॉँग्रेसने निश्चित केल्याची चर्चा आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या वसंतदादा विकास आघाडी व राष्ट्रवादीच्या युतीमधून सौ. संगीता पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. रासपतून किरण बोराडे यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आहे.
शेगाव पंचायत समिती गण खुला झाला आहे. सुरुवातीला भाजपकडून शेगाव विकास संस्थेचे अध्यक्ष सचिन बोराडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र शासकीय ठेकेदाराचा परवाना असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी लागली. त्यामुळे भाजपकडून निश्चित नाव पुढे येत नसले तरी, लक्ष्मणराव बोराडे, डॉ. सतीश भीमराव शिंदे, बलभीम हिप्परकर, अरुण खांडेकर यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. कॉँग्रेसकडून तानाजी शिवाजी शिंदे (वाळेखिंडी), महादेव साळुंखे, संकुल बोराडे, सुभाष हिप्परकर इच्छुक आहेत. वसंतदादा विकास आघाडी व राष्ट्रवादी युतीमधून वाळेखिंडी विकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पांडुरंग शिंदे यांची उमेदवारी निश्चित केल्याची घोषणा वाळेखिंडी येथे युतीचे नेते सुरेश शिंदे यांनी केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षातून बसवंत हिरवे इच्छुक आहेत.
कोसारी पंचायत समिती गण महिलेसाठी आरक्षित असून भाजपकडून प्रतापूरच्या सरपंच सुगंधा माणिक वाघमोडे, मनीषा कोंडीगिरी प्रबळ दावेदार आहेत. कॉँग्रेसकडून नाथा पाटील यांच्या पत्नी अर्चना नाथा पाटील यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर सविता आलदर, विश्रांती वाघमोडे (बेवनूर) यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. वसंतदादा विकास आघाडी व राष्ट्रवादी युतीतून नंदाताई बापू म्हारनूर यांची उमेदवारी निश्चित केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षातून द्वारकाबाई जगन्नाथ सरगर यांचे नाव निश्चित आहे. अपक्ष म्हणून तिप्पेहळ्ळी येथील उच्चशिक्षित अरुणा मोहनराव शिंदे याही इच्छुक आहेत.

Web Title: Who is Shegaon Group Chakra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.