नागरिक छळछावणीत.. नेते नामानिराळे; सांगलीतील चिंतामणीनगरच्या पुलाचे काम बंद कोणी पाडले?
By अविनाश कोळी | Published: September 15, 2023 04:49 PM2023-09-15T16:49:35+5:302023-09-15T16:59:46+5:30
पुलाच्या कामावरून संशयकल्लोळ
अविनाश कोळी
सांगली : दररोज हजारो नोकरदार, विद्यार्थी, नागरिक जीव मुठीत घेत सांगलीच्या जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे गेटवरील गर्दीतून वाट काढत आहेत. खराब रस्त्यावरून शरीराचे हाल करून घेताहेत. नागरिकांना अशा छळछावणीत टाकून लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, रेल्वे प्रशासन नामानिराळे झाले आहेत. चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम राजकीय इशाऱ्यावरून थांबल्याचे सांगितले जात असल्याने नेत्यांबाबतचा संशयकल्लोळ वाढला आहे.
सांगली ते माधवनगर या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांसह स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. दोन महिन्यांपूर्वी चिंतामणीनगरचा मुख्य रेल्वे उड्डाणपूल चांगला पर्यायी रस्ता उपलब्ध न करताच पाडण्यात आला. जुना बुधगाव रस्ता हा अत्यंत गैरसोयीचा, अरुंद व खराब रस्ता नागरिकांच्या नशिबी आला. आठ महिने वनवास भोगण्याची मानसिकता नागरिकांनी केली. मात्र, राजकारण्यांच्या दबावामुळे उड्डाणपुलाचे काम बंद पडल्याने हा वनवास आणखी काही महिने वाढणार आहे. त्यामुळे लोकांचा संताप वाढत आहे.
रुळावर गर्दी अन् लाल दिवा लागला
१३ सप्टेेंबर सायंकाळी ५:३० वाजता : बुधवारी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी एकदा गेट पडले. दहा मिनिटांनी ते उघडल्यानंतर दोन्ही बाजूंना अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी झाली असतानाच साडेपाच वाजता रेल्वे येणार असल्याने लाल दिवा लागला. रुळावर अनेक वाहने होती. ती हटायला तयार नाहीत. साऱ्यांना घाम फुटला. अखेर नागरिकांनीच कोंडी कमी करीत फाटक बंद करण्यास मदत केली.
पुलाच्या कामावरून संशयकल्लोळ
चिंतामणीनगर रेल्वे पुलाचे काम दोन नेत्यांनी बंद पाडल्याचा संशय नागरिकांतून व्यक्त होत आहे. पुलाच्या दुतर्फा दोन नेत्यांच्या इमारती असल्याने हे काम बंद पाडण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. नेत्यांनीही मौन बाळगल्याने हा संशय वाढला आहे.
ठेकेदाराकडून प्रतिसाद नाही
रेल्वे उड्डाणपुलाचे काम करणारे ठेकेदार रोहन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयावर नंतर बोलतो, असे सांगत फोन बंद केला. त्यामुळे ठेकेदाराची अडचण समजू शकली नाही.
नेते, अधिकारी गप्प का?
खासदार, जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, रेल्वे प्रशासन या सर्वांना लोकांच्या वेदना समजत नाहीत का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. रस्त्याची जबाबदारी महापालिकेची, वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची अन् उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकांना दिलासा देण्याची जबाबदारी खासदार, आमदार व जिल्हाधिकाऱ्यांची असताना हे सारे लोक मौन बाळगून आहेत.
रुग्णांनाही थांबावे लागते ताटकळत
अत्यवस्थ रुग्णांना या गेटवर अडकून पडावे लागते. रुग्णवाहिकाही अर्धा, पाऊण तास या रांगेत अडकतात. याठिकाणच्या वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी रेल्वेची असताना रेल्वे प्रशासन निद्रावस्थेत आहे. रेल्वे प्रशासन कोणालाही जुमानत नसल्याने स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांमधून या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. रुग्ण दगावला तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित होत आहे.
पुलाच्या कामात बदल
सांगलीतील भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी संबंधित ठेकेदाराकडे काम थांबल्याबाबत विचारणा केल्यानंतर ठेकेदाराने कामाची मार्गरेखा बदलल्याचे सांगितले. पण, त्याबाबत सविस्तर माहिती त्यांना उपलब्ध झाली नाही.