गेल्या ७० वर्षात मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्याचे नाव सांगा, मनोज जरांगे-पाटील यांचे सरकारला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 02:27 PM2023-11-17T14:27:24+5:302023-11-17T14:28:08+5:30

विट्यातील विराट सभेत सरकारला इशारा

Who tried to oppress the Marathas without giving them reservation says Manoj Jarange Patil | गेल्या ७० वर्षात मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्याचे नाव सांगा, मनोज जरांगे-पाटील यांचे सरकारला आव्हान

गेल्या ७० वर्षात मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्याचे नाव सांगा, मनोज जरांगे-पाटील यांचे सरकारला आव्हान

दिलीप मोहिते

विटा : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाज आज एकवटला आहे. त्यामुळे सरकार आता पुरावे शोधू लागले आहे. गेली ७० वर्षे ओबीसी नेत्यांचा सरकारवर प्रभाव होता. परंतु, आता सरकारला मराठ्यांचे पुरावे सापडू लागले आहेत. मराठ्यांना आरक्षण न देता त्यांना दाबून मारण्याचा कोणी प्रयत्न केला? गेल्या ७० वर्षापासून मराठ्यांचे वाटोळे कोणी केले, त्याचे नाव आता आम्हाला कळायला पाहिजे, असे आव्हान मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिले. यावेळी त्यांनी राजकारणातील भाऊसाहेब, भैय्यासाहेब यांच्या मागे न लागता लेकरांना अभ्यासाकडे वळवावे, असा सल्ला मराठ्यांना दिला.

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांची सांगली जिल्ह्यातील विटा येथे पहिली सभा शुक्रवारी सकाळी झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाज एकवटला होता. शहरात अक्षरश: भगवे वादळ आले होते. जरांगे-पाटील यांचे सकाळी १०.३० वाजता सभास्थळी आगमन झाले. त्यावेळी धनगर समाजाच्यावतीने मराठा आरक्षणाला पाठींबा देत जरांगे-पाटील यांचा घोंगडे व घुंगराची काठी देऊन सत्कार करण्यात आला.

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, ज्या जातीने आरक्षण समजून घेतले त्यांना लगेच आरक्षण मिळाले. पण मराठ्यांनी आरक्षण समजून घ्यायला वेळ लावला. पण वेळाने का होईना मराठा समाज एकत्रीत आला आहे. त्यामुळे सरकारने शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर सरकारला यापुढील काळ जड जाईल. परंतु, आता आरक्षणाची ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे.

गेली ७० वर्षे ओबीसींच्या नेत्यांचा सरकारवर प्रचंड प्रभाव होता. त्यावेळी आमचे पुरावे त्यांनी स्वत:च्या बुडाखाली लपवून ठेवले आणि प्रत्येकवेळी पुरावे नसल्याचे सांगत मराठ्यांना आरक्षण देता येत नसल्याचा कांगावा केला. पण आता घरा-घरातील मराठे एकवटले आहेत. सरकारनेही पुरावे शोधायला सुरूवात केली असून लाखो पुरावे मिळाले आहेत.

त्यामुळे सरकारला आमचा प्रश्न आहे की, १८२२ पासून १९६७ पर्यंत आणि १९६७ पासून २०२३ पर्यंत जे काही पुरावे सापडले आहेत. त्याच्या आधारावर तुम्ही गेल्या ७० वर्षापूर्वीच आरक्षण दिले असते तर आज मराठ्यांची जगात प्रगत जात झाली असती. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का, याचे उत्तर सरकारकडे नाही. मराठा समाजाने सर्व निकष पूर्ण करूनही त्यांना आरक्षण का नाही?

मराठा नेत्यांबाबत बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले, गेल्या ७० वर्षात सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना आमच्या बापजाद्यांनी मोठे केले. आज लेकरांसाठी या नेत्यांच्या मदतीची गरज असताना एकही नेता बोलायला तयार नाही. परंतु, या नेत्यांशिवाय मराठा समाजाने आज ७० टक्के लढाई जिंकली आहे. आनंदाचा क्षण आता जवळ आला आहे. दि. २४ डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे. लेकरासाठी लढा आहे.

आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही. मतभेद आणि एकजूट तूटू देऊ नका, मराठ्यांच्या त्सुनामी विरोधात जायचे कोणीही धाडस करणार नाही. विजय आपलाच आहे. जो आरक्षणाच्या विरोधात जाईल त्याला सोडणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला.

या सभेसाठी विटा शहरात सकाळपासून गर्दी होण्यास सुरूवात झाली होती. सभेसाठी येणाºया लोकांसाठी शहरात ठिकठिकाणी बिस्कीट व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मराठा समाज कृती समितीचे समन्वयक शंकर मोहिते, विनोद पाटील, दहावीर शितोळे, शशिकांत शिंदे, अजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी नेटके नियोजन केले होते. डॉ. जितेश कदम, सुहास बाबर यांच्यासह लाखो संख्येने मराठा समाजाने हजेरी लावली होती.

Web Title: Who tried to oppress the Marathas without giving them reservation says Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.