कवठेमहांकाळमध्ये कोण देणार कोणाची साथ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:24 AM2021-03-20T04:24:11+5:302021-03-20T04:24:11+5:30
अर्जुन कर्पे कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे राजकीय रण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू तापू लागले आहे. या निवडणुकीत कोणाची युती ...
अर्जुन कर्पे
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे राजकीय रण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू तापू लागले आहे. या निवडणुकीत कोणाची युती होणार आणि कोणाची बिघाडी याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक ही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकीपूर्वीची रंगीत राजकीय तालीम असल्याने यानिमित्ताने मोठे राजकीय धुमशान पाहावयास मिळणार आहे.
सध्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि अनिता सगरे गटाची सत्ता आहे. नगराध्यक्ष पंडितने दळवी हे घोरपडे गटाचे आहेत; तर उपनगराध्यक्ष हे सगरे गटाचे आहेत.
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील गटविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अजितराव घोरपडे गट असा सामना झाला होता. एकूण १७ जागांपैकी घोरपडे गटाने पाच व सगरे गटाने चार, तर आबा गटाने चार व खासदार संजयकाका पाटील गटाने चार जागांवर विजय मिळविला होता. आबा गट, सगरे गट आणि घोरपडे गट यांनी एकत्रित येत कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर सत्ता स्थापन केली.
त्यानंतर कवठेमहांकाळ शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत.
गत निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असणारे आबा गट आणि खासदार गट आज एकत्रित आहेत; तर सगरे गट आणि अजितराव घोरपडे गट एकत्रित आहेत. नगरपंचायत निवडणूक अवघ्या सहा ते सात महिन्यांवर येऊन ठेपली आहे. शहरातील नेतेमंडळींच्या छुप्या बैठका, राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना, वंचित आघाडी, आरपीआय, बसपाही मोठ्या जोमाने उतरतील, असे चित्र आहे. त्यामुळे त्यांचा फटका कोणाला बसणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
चाैकट
शहरावर पकड ठेवण्यासाठी...
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत भविष्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम ठरणारी असल्याने खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, अनिता सगरे या नेत्यांनी शहरावर पकड मिळविण्यासाठी हालचालींना सुरुवात केली आहे.