कडेगावच्या रणांगणात कोण बाजी मारणार?
By admin | Published: October 25, 2016 01:07 AM2016-10-25T01:07:37+5:302016-10-25T01:07:37+5:30
चुरशीचा सामना रंगणार : कॉँग्रेस-भाजप आमने-सामने; नगराध्यक्ष निवडीकडे लक्ष
कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीची पहिली निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होत आहे. नगराध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. निवडून येणाऱ्या १७ नगरसेवकांतून नगराध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे कडेगाव शहराच्या पहिल्या नगराध्यक्षा कोण होणार, कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
या निवडणुकीत कॉँग्रेस विरूध्द भाजप असा चुरशीचा सामना रंगणार आहे. येथे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार पतंगराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी गटांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळेच कडेगाव नगरपंचायतीच्या रणांगणात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार २४ ते २९ आॅक्टोबर या कालावधित उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. यात निवडणूक आयोगाच्या संगणक प्रणालीनुसार आॅनलाईन पध्दतीने उमेदवारी अर्ज भरून त्याची प्रिंट सादर करावी लागणार आहे. यासाठी संभाव्य उमेदवारांची निवड, त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता याबाबत कॉँग्रेस आणि भाजप या दोन्ही बाजूला बैठका सुरू झाल्या आहेत. इच्छुकांनी, आपल्यालाच संधी मिळावी म्हणून संबंधित नेत्यांकडे तसेच स्थानिक पातळीवर फिल्डिंग लावली आहे.
कडेगाव ग्रामपंचायत बरखास्त होऊन १६ मार्च रोजी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. नगरपंचायत निर्मितीच्या अगोदर आठ महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत कॉँग्रेसने ९, तर भाजप-काँगे्रस संयुक्त आघाडीने ८ जागा मिळविल्या होत्या. त्यावेळी बिनविरोध निवडून आलेले एकमेव उमेदवार राजू जाधव यांना सरपंचपदी संधी मिळाली होती.
आता येथे कॉँग्रेस आणि भाजप या तुल्यबळ गटात अटीतटीचा सामना रंगणार आहे. माजी मंत्री आमदार पतंगराव कदम, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, तसेच ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, जि. प. सदस्य शांताराम कदम यांनी कडेगाव येथे कॉँग्रेसजनांना एकसंध करून निवडणूक लढविण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख यांनीही कार्यकर्त्यांना ताकद दिली आहे. कॉँग्रेस आणि भाजपमधील ही प्रतिष्ठेची लढाई संबंधित पक्षांच्या चिन्हावरच होणार आहे. येथे कॉँग्रेसचे नेते सुरेशचंद्र थोरात (निर्मळ), माजी सरपंच विजय शिंदे, सोनहिराचे संचालक दीपक भोसले आदी नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, युवा नेते धनंजय देशमुख, वसंतराव गायकवाड, शिवाजीराव देशमुख, उदय देशमुख, गुलाम पाटील, राजू जाधव, माजी उपसरपंच अविनाश जाधव आदी नेत्यांनी कॉँग्रेसला कडवे आव्हान देण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेनेही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.शिवसेनेची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत उत्सुकता आहे. पृथ्वीराज देशमुख भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीची ताकद नगण्य राहिली. तरीही राष्ट्रवादी कॉँग्रेस येथे ताकद अजमावणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. (वार्ताहर)
१७ प्रभागात विभागलेले एकंदरीत ९४२८ मतदार कडेगावची सत्ता कोणाकडे सोपविणार, याबाबत जोरदार चर्चा रंगत आहे.
दरम्यान, कॉँग्रेसने विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवत आगामी काळातील आश्वासनाचा अजेंडा घेऊन निवडणूक मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. तसेच भाजपने विकासाचा निवडणूक जाहीरनामा घेऊन कॉँग्रेसला आव्हान देण्याचा निश्चिय केला आहे. या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आणि निवडणूक अटीतटीची होणार अशी चर्चा आहे.