सांगली विधानसभेच्या जागेसाठी भाजपमध्ये आता दावेदारी कोणाची?, चर्चेतील नावे.. जाणून घ्या
By अविनाश कोळी | Published: September 5, 2024 06:16 PM2024-09-05T18:16:45+5:302024-09-05T18:17:17+5:30
गाडगीळांच्या निर्णयावरून संभ्रम कायम, कार्यकर्त्यांत अस्वस्थता
अविनाश कोळी
सांगली : भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. गाडगीळ यांच्याऐवजी सांगली मतदारसंघातून कोण दावेदारी करणार व कोणाला येथील उमेदवारी मिळणार, हा विषयही चर्चेत आला आहे. पृथ्वीराज पवार, शेखर इनामदार, शिवाजी डोंगरे यांच्यासह अर्धा डझन इच्छुकांची नावे आता चर्चेत आली आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. आता सांगली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून विद्यमान आमदार गाडगीळ यांनी माघार घेतल्याने कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ सांगली व मिरज या दोनच मतदारसंघांत मागील निवडणुकीत भाजपला विजय मिळाला होता. दोन विद्यमान आमदारांपैकी आता गाडगीळ यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
गाडगीळ यांना पर्याय म्हणून यापूर्वीही काही नावे चर्चेत आली होती. ती नावे पुन्हा चर्चेत आली आहेत. माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, दिवंगत भाजप नेते संभाजी पवार यांचे पुत्र पृथ्वीराज पवार, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोेंगरे ही नावे चर्चेत आहेत. यातील बहुतांश जणांनी इच्छुक म्हणून तयारीसुद्धा केली आहे. गाडगीळ त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले तर त्यांना सक्षम पर्याय म्हणून उमेदवार निवडताना भाजप नेत्यांचा कस लागणार आहे.
गाडगीळांच्या निर्णयावरून संभ्रम कायम
सुधीर गाडगीळ यांनी अचानक निवडणुकीपासून फारकत घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. त्यांनी असा निर्णय का घेतला, याबाबत संभ्रम कायम आहे. सर्वमान्य उमेदवार देण्यावरून पक्षांतर्गत गोंधळ होण्याची चिन्हेही आहेत.
कार्यकर्ते विभागले जाण्याची भीती
गाडगीळ यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांशीही त्यांचा समन्वय चांगला आहे. त्यामुळे दोन निवडणुकांमध्ये त्यांना या सर्व नेत्यांची मोट बांधणे सहज शक्य झाले होते. आता गाडगीळ यांनी माघार घेतल्यानंतर इच्छुक उमेदवारांची संख्या वाढणार आहे. ज्या इच्छुकाचे तिकीट डावलले जाईल त्यांचे समर्थक निवडणुकीत अधिकृत उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे करतील का, याबाबत साशंकता आहे.
सुधीर गाडगीळ यांच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. पक्षाने अद्याप विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविलेले नाहीत. लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल. - प्रकाश ढंग, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप