सोशल मीडियाच्या अतिरेकातूनच उमदीत खून, भरकटलेल्या तरुणांना आवरणार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 06:03 PM2022-03-10T18:03:42+5:302022-03-10T18:04:12+5:30
मोबाइलच्या वापराबरोबर सोशल मीडियात तरुणाई गुरफटली. यातून सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेतून वादही उफाळू लागला. यात भरीस भर म्हणून शहराप्रमाणे गुंडगिरी, टोळीयुद्धासारखे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे
गजानन पाटील
संख : शहराबरोबरच ग्रामीण भागातही गुंडांच्या टोळ्यांना राजकीय पाठबळ, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, गावातील जयंती, उत्सव, कार्यक्रमात मानापमान यामुळे आजची तरुणाई भरकटल्याचे जत तालुक्यातील उमदी येथील दुहेरी खुनाने दाखवून दिले आहे. यात दोन उमद्या तरुणांना जीव गमवावा लागला.
जत पूर्व भागातील उमदी हे राजकीय व सामाजिक दृष्टीने संवेदनशील गाव आहे. ग्रामीण भागातील सर्वांत मोठे गाव आहे. येथे पोलीस ठाणेही आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादनात हे गाव अग्रेसर आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बेदाण्याची निर्मिती केली जाते.
गावातून अहमदनगर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. त्यामुळे आर्थिक व सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. लोकांच्या हातात पैसे आले आणि चंगळवादी संस्कृती वाढली. मोबाइलच्या वापराबरोबर सोशल मीडियात तरुणाई गुरफटली. यातून सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेतून वादही उफाळू लागला. यात भरीस भर म्हणून शहराप्रमाणे गुंडगिरी, टोळीयुद्धासारखे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून खुनासारख्या घटना घडू लागल्या. उमदीत मंगळवारी घडलेली घटना ही याचेच उदाहरण आहे.
मृत संतोष राजकुमार माळी हा हुशार विद्यार्थी होता. उदगीर येथे बीएस्सी ॲग्रीच्या तिसऱ्या वर्षात तो शिक्षण घेत होता. गुणवत्तेवर त्याने प्रवेश मिळविला होता. स्पर्धा परीक्षेचीही तयारी करीत होता. त्याची आई बसस्थानकावर हॉटेल चालविते, तर मदगोंडा बगली हा एकुलता एक मुलगा. आई भाजीपाला विक्री करते.
शांततेसाठी प्रयत्न व्हावेत
गावामध्ये वादविवाद, भांडणतंटे सामंजस्याने मिटवून गावपुढाऱ्यांनी शांतता राखण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. राजकारण न करता एकोपा राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.