कोण सांभाळणार पालिकेचा बझार?

By admin | Published: October 18, 2015 11:01 PM2015-10-18T23:01:07+5:302015-10-18T23:40:34+5:30

वचकच संपला : काँग्रेस नेतृत्वावर भवितव्य अवलंबून

Who will handle the electricity bill? | कोण सांभाळणार पालिकेचा बझार?

कोण सांभाळणार पालिकेचा बझार?

Next

शीतल पाटील --सांगली--महापालिकेतील नानाविध तऱ्हेच्या नगरसेवकांत मदन पाटील यांचा जबरदस्त वचक होता. केवळ डोळे मोठे केले तरी वादळे शांत व्हायची. त्यांच्या हयातीतच महापालिकेतील काँग्रेसला फाटाफुटीचे ग्रहण लागले होते. आता मदनभाऊंच्या पश्चात महापालिकेच्या बिग बझारचे काय होणार, याची चर्चा आता शहरात होऊ लागली आहे. मदनभाऊ गटाचे नेतृत्व कोण करणार, यावरच महापालिकेची समीकरणे अवलंबून आहेत.
मदनभाऊंचा पक्ष कोणता, यापेक्षा त्यांच्या गटाचीच चर्चा अधिक होत असे. मदन पाटील हाच आमचा पक्ष, असे मानणाऱ्यांची संख्याही कमी नाही. केवळ मदनभाऊंनी शब्द टाकला की हजारो तरुण कामाला लागत. तीच स्थिती महापालिकेतील नगरसेवकांची होती. एखादे पद मागताना, ते न मिळाल्यास थयथयाट करणारे नगरसेवक, मदनभाऊंचा निरोप आला की शांत होत. त्यांच्या शब्दापलीकडे जाण्याची हिंमत कोणाची होत नसे. पण आता त्यांच्या पश्चात हा वचकही संपला आहे.
नगरसेवकांच्या नाना तऱ्हा सांभाळताना, त्यांच्या इच्छा- आकांक्षांची पूर्तता करताना भल्या-भल्यांच्या नाकी नऊ येत असे. त्याचा अनुभव राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी घेतला आहे. विकास महाआघाडीच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेची सत्ता मदनभाऊंच्या हातून हिसकावून घेतली. तेव्हा मदनभाऊंनी महाआघाडीचा ‘बिग बझार’ संपेल, असे भाकित केले होते आणि ते खरेही ठरले. पण अवघ्या तीन वर्षात त्यांच्या सत्तेला सुरूंग लागला. नगरसेवकांची फाटाफूट झाली. तत्कालीन नगरपालिका व महापालिकेची ही सर्कस तब्बल ३५ वर्षे सांभाळण्यात केवळ मदनभाऊच यशस्वी ठरले होते.
दोन वर्षापूर्वी पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत सत्तांतर झाले. पण गेल्या वर्षभरात पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमध्ये फाटाफूट सुरू झाली होती. पतंगराव कदम या नावाने नवा गट तयार होत आहे. काँग्रेसच्या ४३ नगरसेवकांपैकी दहा नगरसेवक या गटात आहेत. त्यात मदनभाऊंनी ज्यांना पालिकेच्या राजकारणात आणले, ते कधीकाळचे निष्ठावंत म्हणविणारे नगरसेवकही आहेत. त्यांच्या हयातीतच फुटीचे ग्रहण लागले असताना, आता त्यांच्या पश्चात काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. लाखो रुपये खर्च करून नगरसेवक झालेल्यांना आता पुढील निवडणुकीची तयारी करायची आहे. त्यासाठी त्यांचे पालिकेतील मलिद्यावरच लक्ष आहे. अशा काही नगरसेवकांना सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे.
महापालिकेत पतंगराव कदम, जयंत पाटील, संभाजी पवार यांच्यासह भाजपच्या नेतृत्वाखाली काम करणारे नगरसेवकही आहेत. त्यात मदनभाऊंचा गट मोठा आहे. आता या गटाला आधार देण्याचे काम कोण करणार, हा खरा प्रश्न आहे. पतंगराव कदम हे काँग्रेसचे नेते असले तरी, त्यांनी महापालिकेच्या राजकारणात फारसे लक्ष घातलेले नाही. जयंतरावांनी पालिकेत पाच वर्षे कारभार केला आहे. त्यात गेल्या वर्षभरात मदनभाऊ व जयंतरावांचे सूर जुळले होते. त्यादृष्टीनेही तर्कवितर्क काढले जात आहेत. नजीकच्या काळात मदनभाऊ गटाचे नेतृत्व कोण करणार, यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल.


जयश्रीतार्इंसाठी आग्रह
मदनभाऊ निष्ठावंतांचा ओढा मात्र त्यांच्या घराण्यातील व्यक्तीकडे आहे. सध्या तरी या निष्ठावंतांना त्यांच्या पत्नी जयश्रीतार्इंचाच आधार दिसून येतो. प्रत्येकाच्या तोंडी जयश्रीतार्इंचे नाव आहे. त्यांनी मदनभाऊ गटाची जबाबदारी सांभाळावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. पण त्या काय निर्णय घेतात, यावर बरीचशी गणिते अवलंबून आहेत.

Web Title: Who will handle the electricity bill?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.