पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या गदेची मानकरी कोण?, सांगलीच्या मैदानात आज निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 11:53 AM2023-03-24T11:53:25+5:302023-03-24T11:54:23+5:30
पहिलेच महिला केसरी मैदान असल्याने अत्यंत प्रतिष्ठेचे
सांगली : गेली २० वर्षे महिलाकुस्तीगीर मैदाने गाजवत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आखाड्यांत पदकांना गवसणी घालत आहेत; पण ‘महाराष्ट्र केसरी’चा बहुमान मिळविण्यासाठी त्यांना दोन दशके वाट पाहवी लागली आहे. ‘पहिली महिला महाराष्ट्र केसरी’चा बहुमान देण्याचा मान सांगलीकरांना मिळाला आहे. पहिल्या गदेची मानकरी कोण, याचा निकाल शुक्रवारी रात्री जिल्हा क्रीडा संकुलाच्या आखाड्यात लागेल.
सांगली, कोल्हापूर, पुणे, साताऱ्यासह महाराष्ट्रभरातून ४५० हून अधिक महिला कुस्तीगीर यानिमित्त सांगलीत आल्या आहेत. पहिलेच महिला केसरी मैदान असल्याने अत्यंत प्रतिष्ठेचे ठरले आहे. गुरुवारी दुपारपर्यंत स्पर्धकांची वजने घेण्यात आली. सहभागी कुस्तीपटूंमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके मिळविलेल्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
महिला कुस्तीच्या आखाड्यात उतरल्यापासून राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या अनेक स्पर्धा झाल्या. राज्य अजिंक्यपद स्पर्धाही झाल्या; पण त्यावर ‘केसरी’पदाची मोहोर उमटलेली नव्हती. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची कीर्तीपताका फडकविणाऱ्या महिलांच्या सन्मानासाठी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा या वर्षीपासून सुरू केली. ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६८ आणि ७२ किलो वजन गटातून सहभाग देण्यात आला आहे. महिला केसरी किताबासाठी ६५ ते ७६ किलो वजनी गटातून सहभाग असेल.
या असतील दावेदार
कोल्हापूरची अनेक पदकांची मानकरी असणारी वैष्णवी कुशाप्पा, शिरोळची ज्युनिअर, महिला मिनी ऑलिपिक, खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेतील पदकांची मानकरी अमृता पुजारी यांच्या डावपेचांकडे लक्ष असेल. घरच्या मैदानात खेळणारी तुंगच्या प्रतीक्षा बागडीकडून सांगलीकरांच्या अपेक्षा आहेत. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत तिने सांगलीचे नाव गाजवले आहे. साताऱ्याची धनश्री मांडवे ही पोलिस खेळाडूदेखील पहिल्या गदेवर नजर ठेवून आहे. सध्या ती क्रीडा प्रबोधिनीत सराव करत आहे. तिने शालेय नॅशनल ज्युनिअर आणि ऑल इंडिया स्पर्धेत पदक मिळवले आहे. नगरची आंतरराष्ट्रीय पदक विजेती भाग्यश्री फंड, पुण्याची आंतरराष्ट्रीय मल्ल कोमल गोळे याही दावेदार आहेत.
संगणक ठरवणार प्रतिस्पर्धी
वजनानुसार स्पर्धेसाठी नोंदणी झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे स्पर्धक ठरवले गेले आहेत. एखाद्या कुस्तीगीराची लढत त्याच वजनी गटात कोणाशी होणार हे सॉफ्टवेअरद्वारे निश्चित होणार आहे. त्यामुळे नोंदणीनंतर काही वेळातच लढती निश्चित होणार आहेत. लढतींमध्ये पारदर्शकताही राहणार आहे.