अख्ख्या गावाचा गहू आगीत खाक !
By Admin | Published: March 21, 2017 11:17 PM2017-03-21T23:17:31+5:302017-03-21T23:17:31+5:30
आरल गावात निराशा : पंधरा लाखांचे नुकसान; ६१ शेतकऱ्यांना फटका, मळणीसाठी एकत्र केलेला गहू भस्मसात
मणदुरे : पाटण तालुक्याच्या चाफोली विभागातील पुनर्वसित आरल गावात अचानक लागलेल्या आगीत शेतात कापून ठेवलेला ६१ शेतकऱ्यांचा गहू जळून खाक झाला. तसेच शेतातील गवताच्या गंजी, शेणखत, जळावू लाकडेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोयना धरणातून पुनर्वसित झालेले आरल गाव चाफोली विभागात आहे. या गावात ६१ कुटुंबे आहेत. गावच्या शिवारातील गहू एकत्र गोळा करून आरल येथील भैरी-केदार मंदिराशेजारी मोकळ्या जागेत सर्व कुटुंबांचा गहू मळणीसाठी एकत्र करून ठेवला होता. एकत्र केलेला गहू मळणी यंत्राने मळायचा होता.
दोन दिवसांत या ठिकाणी मळणी यंत्र येणार होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, मंगळवारी दुपारी अचानक आग लागून सर्व गहू जळून खाक झाला.
गावकामगार तलाठी पी. पी. शिर्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सत्यजितसिंंह पाटणकर, पाटण पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, माजी पंचायत समिती सदस्या शोभा कदम, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव, राजेश पवार, नवनाथ कदम, माजी सरपंच विजय शिंंदे, हरीभाऊ सूर्यवंशी, सुभाष पवार, नथुराम झोरे, रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या आगीत श्रीपती पवार, काशिनाथ पवार, अशोक पवार, रामचंद्र पवार, मारुती पवार, गोविंंद धुमाळ, तानाजी पवार, बाबूराव पवार, सीताराम पवार, किसन पवार, निवृत्ती पवार, बनाबाई पवार, नारायण पवार, रामचंद्र पवार, अर्जुन पवार, वैजंता पवार, कलाबाई पवार, सीताराम पवार, राजाराम पवार, पांडुरंग पवार, वसंत पवार, लक्ष्मी पवार, लक्ष्मण पवार, पाराबाई पवार, ज्ञानू पवार, तुकाराम पवार, मोहन पवार, आनंदा पवार, जगन्नाथ पवार, बाळाबाई पवार, चंद्रकांत कदम, गोविंंद कदम, विलास कदम, बबाबाई कदम, संगीता कदम, बंडू कदम, निवृत्ती पवार, शिवाजी पवार, रामचंद्र सपकाळ, तानाजी सपकाळ, पांडुरंग पवार, शंकर कदम, रामचंद्र कदम, चंद्रकांत सपकाळ, भागुजी सपकाळ, प्रकाश सपकाळ, पांडुरंग कदम, बंडू कदम, श्रीरंग पवार, विठ्ठल यादव, अशोक कदम, अंकुश कदम, विश्वास कदम, विश्वनाथ पवार, पांडुरंग पवार, धोंडिराम पवार या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)
जीप चालकाचे प्रसंगावधान
आरल मार्गावरून मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक जीप जात होती. त्यावेळी गव्हाला आग लागल्याचे जीप चालकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर या चालकाने प्रसंगावधान राखत ग्रामस्थांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली. ग्रामस्थांनी तातडीने फोन करून पाटण येथील अग्निशामक पथकास पाचारण केले. अग्निशामक पथक आल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत गहू, गवताच्या गंजी, जळावू लाकडे, शेणी, शेणखत असे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.