अच्छे दिन कुणाचे? काँग्रेस, भाजप की राष्ट्रवादीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 04:12 PM2017-10-24T16:12:47+5:302017-10-24T16:18:39+5:30
सांगली जिल्ह्यात चौफेर उधळलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वारूला लगाम लागला, भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला, असं विरोधकांच्या तंबूत बोललं जाऊ लागलंय, तर भाजप ग्रामीण भागात रूजू लागलाय, २०१२ पेक्षा २०१७च्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसपेक्षा भाजपला जादा जागा मिळाल्यात, असा दावा भाजपनं केलाय.
श्रीनिवास नागे
ग्रामपंचायत निवडणुका मागच्या आठवड्यात संपल्या, पण आता त्यांचं कवित्व सुरू झालंय. बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थानिक पातळीवर, तेथील गटातटातील हेव्यादाव्यांवर लढल्या जातात. त्या व्यक्तिकेंद्रित राजकारणानुसारही फिरतात. मात्र त्यांना नंतर पक्षीय लेबल लावलं जातं. त्यामुळंच जिल्ह्यात चौफेर उधळलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वारूला लगाम लागला, भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला, असं विरोधकांच्या तंबूत बोललं जाऊ लागलंय, तर भाजप ग्रामीण भागात रूजू लागलाय, २०१२ पेक्षा २०१७च्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसपेक्षा भाजपला जादा जागा मिळाल्यात, असा दावा भाजपनं केलाय.
या निकालानंतर भाजप ग्रामीण भागात रूजू लागलाय, असं सांगणाऱ्या जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या स्वत:च्याच पलूस-कडेगावसह, जत, शिराळा, वाळवा, खानापूर आणि सांगली विधानसभा मतदारसंघांत भाजपला काँग्रेस-राष्ट्रवादीनं खोडा घातलाय.
भाजप म्हणजे शहरी पक्ष, असं तथाकथित समीकरण भाजपविरोधकांकडून मांडलं जातं. तसं असेल तर शहरांशेजारच्या ग्रामीण भागावरही या शहरी पक्षाचा प्रभाव असायला हवा, पण यालाही ग्रामपंचायत निवडणुकांनी छेद दिलाय... कारण सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गावांत परस्परविरोधी चित्र दिसतंय.
मिरज विधानसभा मतदारसंघातल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला धूळ चारलीय. मिरज तालुक्यातल्या एकोणीस ग्रामपंचायतींत (हा त्यांचा दावा हं!) भाजपनं झेंडा रोवलाय.
विशेष म्हणजे मिरज विधानसभा मतदारसंघातल्या शहराशेजारच्या सतरा गावांत आ. खाडे यांनी ताकद दाखवून दिलीय. अर्थात यात पक्षापेक्षा आ. खाडें यांचं स्वत:चं कर्तृत्व आणि त्यांच्याकडची पॉवरच कामी आलीय. इथं खासदार संजयकाका पाटील यांचाही स्वत:चा गट आहे आणि तो आ. खाडेंसोबत होता.
(खासदारांचं आमदारांशी तसं जुळत नसतानाही!)
याच्या नेमकं उलटं चित्र सांगली विधानसभा मतदारसंघात दिसतंय. या मतदारसंघातल्या तेरापैकी सात गावांत निवडणूक झाली, पण केवळ दोन गावांत भाजपची सत्ता आली!
हरिपूर आणि माधवनगर ही सांगली शहराला खेटून असलेली गावं. हरिपुरातला भाजपचा विजय हा केवळ खासदार संजयकाका पाटील गटाचा. संजयकाकांच्या रसदीवर संगूदादा बोंद्रे गटाची सूत्रं हलवणाऱ्या अरविंद तांबवेकर यांनी एकतर्फी सत्ता आणली. माधवनगरच्या सत्तेसाठी तर टोकाचा संघर्ष झाला. पण बाजी मारली भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांच्या पॅनेलनं.
विशेष म्हणजे भाजपच्या दुसऱ्या गटानं विरोधात खेळ्या केल्या असतानाही डोंगरे यांनी वर्षानुवर्षांची हुकूमत सिद्ध केली. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा गट छुप्या पद्धतीनं त्यांच्या विरोधात होता.
शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार (ते खरंच शिवसेनेत आहेत का?) यांच्या पुढाकारानं तयार झालेल्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवाराला आरएसएसच्या गटाची मदत होती.
(प्रचाराच्या पोस्टरवरचे, सोशल मीडियावरील प्रचारपत्रांवरचे चेहरे याचा पुरावा देतात...)
बुधगावात तर आमदारांचा गट आणि डोंगरे यांचा गट थेट विरोधात होते. डोंगरे यांनी पंचायत समितीचे सदस्य विक्रम पाटील यांच्यासोबत हातमिळवणी करत पॅनेल उभं केलं होतं, तर आ. गाडगीळ यांच्या गटानं काँग्रेसमधल्या मदनभाऊ पाटील गटाशी जुळवून घेत स्वतंत्र पॅनेल दिलं होतं.
परिणामी सरपंचपदाच्या लढतीत वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या गटाच्या अपक्षानं दोन्ही पॅनेलला धूळ चारली. भाजपला ना सत्ता मिळाली, ना सरपंचपद!
भाजपमधल्या गटबाजीनं नांद्रे आणि बिसूरमध्ये वाताहत झाली आणि काँग्रेसनं चारीमुंड्या चीत केलं. पद्माळेत तर भाजपला पॅनेलही मिळालं नाही. तिथं राष्ट्रवादीनं बाजी मारली. बामणोलीत आमदार आणि डोंगरे गट एकत्र असूनही सतरापैकी सात जागा मिळाल्या, राष्ट्रवादीनं नाकावर टिच्चून सत्ता काबीज केली.
जाता-जाता : मिरज विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत सांगली मतदारसंघातल्या सांगली-कुपवाड शहरांशेजारच्या गावांमधले हे निकाल भाजपचा परतीचा प्रवास दाखवतात, की काँग्रेस-राष्ट्रवादीचे सुरू झालेले अच्छे दिन ? हा व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा नमुना, की आमदार गटाच्या वाट्याला आलेलं नाकारलेपण? सांगली शहरातील बदलत्या राजकारणाचा प्रभाव की, स्थानिक पातळीवरचं राजकारण? भाजपमधल्या कुजबुजीतून प्रश्नांचं हे कवित्व सुरू झालंय...
ताजा कलम : वरील प्रश्नांनी अस्वस्थ होणाऱ्यानी आणि गुदगुल्या होणाऱ्यानी आपापल्या सोयीनं उत्तरं शोधावीत!