इस्लामपुरात कोणाचे पाऊल मागे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:17+5:302021-06-05T04:20:17+5:30
इस्लामपूर : बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटातील मैदानात इस्लामपुरातील चार उमेदवार आहेत. यातील तिघे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक ...
इस्लामपूर : बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटातील मैदानात इस्लामपुरातील चार उमेदवार आहेत. यातील तिघे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. संस्थापक पॅनल आणि रयत पॅनल यांचे मनोमिलन झाले, तर सत्ताधारी सहकार पॅनलला कोंडीत पकडण्यासाठी दोघांना माघार घ्यावी लागणार आहे. तशी तयारी सुरू झाली आहे.
मागील निवडणुकीवेळी इस्लामपुरातील माजी नगराध्यक्ष दिवंगत विजयभाऊ पाटील यांच्या घरात चकमक झाली होती. त्यांचे चुलत बंधू संजय पाटील सहकारमधून उभे होते, तर संजय पाटील यांचे थोरले बंधू शहाजी पाटील नव्याने स्थापन झालेल्या अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलचे स्टार प्रचारक होते. संस्थापक पॅनलकडून विजयभाऊंचे कट्टर समर्थक युवराज पाटील यांनी संजय पाटील यांना कडवे आव्हान दिले होते. ही दुरंगी लढत कृष्णा उद्योग समूहात चर्चेची ठरली होती.
यंदा इस्लामपुरात सहकार पॅनलकडून विद्यमान संचालक संजय पाटील हेच एकमेव उमेदवार आहेत. त्यांच्या शेताच्या बांधाला बांध असलेले माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे समर्थक माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी रयत पॅनलमधून अर्ज भरला आहे. यापूर्वी ते ‘रयत’च्या डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमधून संचालक बनले होते. त्यांची लोकप्रियता आणि आर्थिक ताकद पाहता सहकार पॅनलपुढे ते आव्हान उभे करतील, अशी चर्चा आहे.
यावेळी संस्थापक पॅनलकडून राष्ट्रवादीचे युवराज पाटील आणि दिवंगत एम. डी. पवार यांच्या घराण्यातील माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. मनोमिलन झाले तर या दोघांना रणांगणातून माघार घेतल्याशिवाय पर्याय नाही. तिरंगी लढत झाल्यास एक पाऊल मागे कोण घेणार, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
चौकट
इस्लामपुरातील उरुण परिसरात आठशे सभासद संख्या आहे. तेथे नेहमीच भावकीचे राजकारण रंगते. सहकार पॅनलचे डॉ. सुरेश भोसले मूळ रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते यांच्या घरातील आहेत. ते उरुण येथील भोसले-पाटील या भावकीत दत्तक आहेत. त्यामुळे या नात्याचा धागा निवडणुकीत नेहमीच चर्चेत असतो.