कवठेमहांकाळचे बंड कोणाच्या पथ्यावर?
By admin | Published: February 15, 2017 11:30 PM2017-02-15T23:30:53+5:302017-02-15T23:30:53+5:30
लक्षवेधी लढती : राष्ट्रवादी-स्वाभिमानी आघाडी व भाजप-काँग्रेस यांच्या विकास आघाडीतच सामना
लखन घोरपडे ल्ल देशिंग
कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नाराजांनी बंडखोरी करून आघाडीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच गट व गणांत बंडोबांची उमेदवारी कुणाच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा सुरू आहे.
तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटात सहा उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्यापैकी कुची गटात तीन उमेदवार, ढालगाव गटात दोन, तर देशिंग गटात एक अपक्ष उमेदवार आहे. यातील बहुतेकजण राष्ट्रवादीचे आहेत. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादीच्याच उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. केवळ रांजणी गटात भाजप व काँग्रेसप्रणित विकास आघाडी, स्वाभिमानी विकास आघाडी, शिवसेना व शेतकरी संघटना पुरस्कृत उमेदवार असून इतर तीनही गटात बंडखोरांचे आव्हान आहे.
जि. प. व पं. स.साठी तालुक्यात काही ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढत होत आहे. परंतु सर्वसाधारण लढती राष्ट्रवादीप्रणित स्वाभिमानी विकास आघाडी विरूध्द भाजप व काँग्रेसप्रणित विकास आघाडीतच होणार आहेत. काही ठिकाणी भाजप आघाडीने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांनी स्वाभिमानी विकास आघाडीला आव्हान दिले आहे. सर्वाधिक बंडखोरी राष्ट्रवादीमध्ये असून, ढालगाव गटात राष्ट्रवादीचेच अर्जुन कर्पे यांनी आघाडीच्या उमेदवाराला आव्हान दिले. कुची गटातही दोन अपक्ष, तर देशिंग गटात राष्ट्रवादीच्याच सुरेखा कोळेकर यांनी स्वाभिमानी विकासच्या उमेदवाराविरूध्द रणशिंग फुंकले आहे.
पंचायत समितीसाठीही अपक्षांनी बाणा कायम राखला असून आठ गणांसाठी सहा अपक्ष रिंगणात आहेत. कुची गणात दोन अपक्षांनी स्वाभिमानी व विकास आघाडीच्या विरोधात बंड केले आहे. याशिवाय स्वाभिमानी पक्षामुळे येथे पंचरंगी लढत आहे. कोकळे गणात सहा उमेदवार आहेत. मळणगाव गणात स्वाभिमानी विकास आघाडी व विकास आघाडी यांच्यातच दुरंगी सामना होत आहे. देशिंग गणात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नसल्याने, सुहास पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना विकास आघाडीने पुरस्कृत केले आहे, शिवाय रिपब्लिकन पार्टीनेही येथे उमेदवार दिला आहे. एक अपक्षही रिंगणात असल्याने येथे चौरंगी लढत होत आहे. हिंगणगाव व रांजणी गणात मात्र थेट लढती होत आहेत.