तेढ नसताना जतला पोलीस फौजफाटा कशाला?, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 01:10 PM2022-02-17T13:10:53+5:302022-02-17T13:11:42+5:30
शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडूनच ही वसुली करुन घ्यावी
जत : कोणतीही जातीय, राजकीय दंगल, खून, मारामारी असा कोणताही प्रकार घडला नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा पोलीस फौजफाटा जत शहरात तैनात केला आहे. शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडूनच ही वसुली करुन घ्यावी, अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी घेतल्याशिवाय बसविला जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे आम्हाला त्यांचे विचार पटले नाहीत. त्यामुळे आम्ही बैठक सोडून बाहेर आलो. यापूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विनापरवाना मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. तासगाव आणि विश्वजीत कदम यांच्या मतदारसंघात मूर्ती बसविण्यात आली आहे.
कदम व त्यांचे नातेवाईक आ. विक्रम सावंत यांनी प्रशासनावर दबाव टाकल्याने शिवाजी पुतळा उभारणीत आडकाठी आणली गेली. जिल्हाधिकाऱ्यांनी विनाकारण तीन उपाधीक्षक, बारा पोलीस निरीक्षक, यासह बाराशे पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. कोणतीही राजकीय दंगल, खून, मारामारी असे प्रकार झाले नसताना शहराला छावणीचे स्वरूप देण्यात आले आहे.
ते म्हणाले की, कोरोना काळात विविध वैद्यकीय उपचारांसाठी कोट्यवधींचा खर्च दाखविला आहे. याला स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमुळे पोलीस बंदोबस्तावर शासनाचा दीड ते दोन लाख खर्च पडत आहे. हा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा. मी स्वतःच्या हिमतीवर दोन वेळा कारखान्यावर, बँकेवर व आमदार म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे राजकीय स्टंट करण्याचा संबंधच येत नाही. उलट जिल्हा बँकेत पराभव झाल्याने अस्तित्व संपण्याची भीती वाटत असल्याने आ. सावंत माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत.
जयंतरावांच्या भेटीनंतर पुढील निर्णय
शिवाजी पुतळ्याबाबत वर्गणी गोळा करायला वेळ लागला, त्यामुळे पुतळ्याचे काम रखडले. हे आम्ही मान्य करतो. मात्र, आमदार सावंत यांनी एका पैशाचीही मदत या पुतळ्यासाठी दिली नाही. पुतळा बसवू नये यासाठी पोलिसांचा प्रचंड दबाव आला आहे. यासाठी आम्ही पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार असून, त्यानंतरच पुढील दिशा ठरेल, असे जगताप यांनी सांगितले.