मुख्यमंत्र्यांना सांगलीबद्दल द्वेष का? : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 09:13 PM2018-07-30T21:13:55+5:302018-07-30T21:18:47+5:30
महापालिका क्षेत्रात भाजपकडे बळ उरलेले नाही. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून दोन्ही काँग्रेसच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला.
सांगली : महापालिका क्षेत्रात भाजपकडे बळ उरलेले नाही. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून दोन्ही काँग्रेसच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साडेतीन वर्षात कधीही सांगलीला आले नाहीत. सांगलीकरांबद्दल त्यांच्या मनात द्वेष का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पाटील म्हणाले की, निवडणूक काळात गैरप्रकारांना आळा घातला पाहिजे. पण प्रशासन एककल्ली कारवाया करीत आहेत. मिरजेत रात्रीच्या सुमारास काँग्रेस उमेदवारांच्या घरात घुसून चित्रिकरण केले गेले. पदयात्रेत सहभागी कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या धमक्या दिल्या जात आहेत. ख्रिश्चन समाजातील एका व्यक्तीला तर पोलीस ठाण्यात तीन दिवस बसवून घेऊन जाब विचारला गेला. महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून येणार नाहीत, हे पाहून आता पोलीस बळाचा वापर केला जात आहे. यात अधिकाऱ्यांचा दोष नाही. तरीही मुख्यमंत्री, मंत्री, सत्ताधाºयांना खूश करण्यासाठी काही वेगळे प्रकार सुरू आहेत. आम्ही दाखवतो, त्या घरांची झडती त्यांनी घ्यावी, प्रशासनाने त्याचा अतिरेक करू नये.
भाजपने जनतेचा विश्वास गमावला आहे. मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या प्रश्नांवर ते अपयशी ठरले आहेत. महागाई, पेट्रोल दरवाढीने जनता हैराण झाली आहे. त्यामुळेच भाजपला जनतेचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री फडणवीस सांगलीला आले नसावेत. गेल्या साडेतीन वर्षात ते कधीही सांगलीला आले नाहीत. ते सांगलीकरांचा इतका द्वेष का करतात, असा टोला लगावत पाटील म्हणाले की, या शहरात नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी दोन्ही काँग्रेसने आघाडीचा निर्णय घेतला आहे. आमचा जाहीरनामा सामान्य लोक केंद्रबिंदू मानून तयार केला आहे. त्याची निश्चित पूर्ती केली जाईल.
मुख्यमंत्र्यांचीच दिशाभूल
मुख्यमंत्र्यांचा एक संदेश व्हायरल झाला आहे. त्यात ते स्क्रीनवर वाचून संदेश देत असल्याचे दिसते. त्यांनी सांगितलेली आकडेवारीही चुकीची आहे. ट्रक टर्मिनलला ते ट्रॅक टर्मिनल म्हणाले. ते हुशार आहेत. पण त्यांची कुणीतरी दिशाभूल केली असावी. आम्ही सुरू केलेल्या अनेक योजनांचा उल्लेख त्यांनी संदेशात केला आहे. या योजनांचे श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
बातमीला जोड....
ईव्हीएमची आधी तपासणी व्हावी
ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी ईव्हीएमची तपासणी सर्वपक्षीय उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर व्हावी. थेट केंद्रावर ईव्हीएमची तपासणी करून मतदान प्रक्रिया सुरू करू नये, असे पत्र प्रशासनाला दिले आहे. मतांची बेरीज करतानाही ५० नव्हे, तर ५०० मते ईव्हीएमवर टाकली जावीत, असेही पाटील म्हणाले. जनतेचा प्रतिसाद नसल्याने भाजपचा ईव्हीएम हा शेवटचा पर्याय असू शकतो, असा टोला त्यांनी लगावला.