सांगलीतील पाणी प्रश्नावर पालकमंत्री, आमदार गप्प का?, ३ मार्चला ठिय्या आंदोलन
By अविनाश कोळी | Published: February 26, 2024 06:51 PM2024-02-26T18:51:46+5:302024-02-26T18:52:56+5:30
सर्वपक्षीय कृती समितीचा सवाल
सांगली : कृष्णा नदी कोरडी पडत असून सांगली, कुपवाडमधील नागरिकांचे अपुऱ्या व दूषीत पाण्यामुळे हाल होत आहेत. पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यानंतरही पालकमंत्री, आमदार, खासदार गप्प कसे बसू शकतात, असा सवाल सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. याप्रश्नी तोडगा निघाला नाही, तर येत्या ३ मार्चला पालकमंत्री व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला.
सांगलीच्या ‘कष्टकऱ्यांची दौलत’ सभागृहात सोमवारी सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली. निमंत्रक सतीश साखळकर म्हणाले की, गेले काही दिवस महापालिका क्षेत्रात गढुळ, दूषित व अळीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना गेंड्याची कातडी असलेल्या प्रशासनावर याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही.
नगरसेवकांची कारकीर्द संपली म्हणून त्यांची जबाबदारी संपली नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा हे नगरसेवक निवडणुकीस सामोरे जाणार नाहीत का? प्रशासन, आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, विरोधी पक्ष पाणी प्रश्नावर गप्प का आहेत, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
सांगली शहराच्या निम्म्या भागास ७० एम. एल. डी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो तो शुद्ध व पुरेसाा आहे. अर्ध्या शहरास ५६ एम.एल.डीमधून पाणीपुरवठा केला जातो. हा प्रकल्प कालबाह्य झाल्याने दूषीत पाणीपुरवठा होत आहे, अशी माहिती साखळकर यांनी दिली.
कोयना धरणातून कृष्णा नदीत सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी सोडण्यासाठी वारंवार सातारा पाटबंधारे मंडळ व साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याशी पत्रव्यवहार करावा लागत आहे. धरणातील हक्काच्या पाण्याबाबत योग्य ते धोरण ठरवण्यात यावे, अन्यथा येत्या ३ मार्चला जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला.
बैठकीस माजी आमदार नितीन शिंदे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, पद्माकर जगदाळे, सागर घोडके, हणमंतराव पवार, अशफाक शेख, विश्वजित पाटील, अंकुश केरीपाळे, विजय जाधव, गजानन साळुंखे, उमेश देशमुख, मिलिंद सावंत, किरणराज कांबळे, संजय पिराळे, किशोर जगदाळे, शिवाजीराव सावंत, रेखा पाटील, डॉ. संजय पाटील, संजय चव्हाण, संदीप दळवी, ऋषिकेश पाटील, दिलीप माळी, शुभम पाटील, अजित काशीद, मुस्तफा मुजावर, रुपेश मोकाशी, निलेश पवार आदी उपस्थित होते.