Sangli: टेंभूच्या पाण्याबाबत कवठेमहांकाळवर अन्याय का?, नागरिकांनी दिला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
By अशोक डोंबाळे | Published: May 2, 2024 05:33 PM2024-05-02T17:33:37+5:302024-05-02T17:34:32+5:30
गावातील पशुधन धोक्यात..
ढालगाव : कवठेमहांकाळ तालुका म्हणजे टेंभू योजनेचा शेवटचा टप्पा आहे. या भागात पाणी सोडून महिना होऊन गेले तरी या तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. कवठेमहांकाळ तालुका वगळता ही योजना सांगोला, आटपाडी, तासगाव आदी लाभ क्षेत्रातील तालुक्यांत जोमाने सुरू आहे. दोन दिवसांत पाणी द्यावे, अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा तालुक्यातील मतदारांनी दिला आहे.
मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता तालुक्यातील मतदारांची मोरया कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी अजितराव घोरपडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काय ते विचारतो, असे समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदार थांबण्याच्या मानसिकतेत नाहीत.
या योजनेपासून ढालगावसह परिसरातील एकवीस गावे वंचित आहेत. शासकीय निधीबाबतीत ही अशीच परिस्थिती आहे. तासगाव तालुक्याला ७० टक्के निधी तर कवठेमहांकाळ तालुक्याला वितरिका महिनाभरापासून बंद आहे. तासगाव, सांगोला, आटपाडी, टेंभू योजनेच्या सर्व वितरिका सुरू आहेत. पिण्यासाठी पाणी नाही. ढालगाव येथील तलाव पूर्ण कोरडा पडला आहे.
कूपनलिकेला पाणी नाही, तर विहिरींनी तळ गाठला आहे. उन्हाचा कडाका व तापमानाची तीव्रता वाढली आहे, असे असताना फक्त कवठेमहांकाळ तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांत टेंभू योजनेचे पाणी सुरू आहे. मग कवठेमहांकाळबाबतच असा निर्णय का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.
गावातील पशुधन धोक्यात..
दोन दिवसांत पाणी अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा मतदारांनी दिला. ढालगावसह परिसरातील एकवीस गावांतील पशुधन धोक्यात आले आहे. तर पाण्याची अवस्था बिकट आहे. याबाबत कनिष्ठ अभियंता यांना विचारले असता ते म्हणतात की, आम्हाला वरिष्ठांनी याबाबत काही सांगितले नाही. मग प्रश्न निकालात निघणार कसा, या विवंचनेत मतदार आहेत. यावेळी घोरपडे यांनी नागरिकांना समजाविण्याचा प्रयत्न केला.