सांगलीत शालेय पोषण आहारातील चोरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?

By अशोक डोंबाळे | Published: March 29, 2023 04:45 PM2023-03-29T16:45:51+5:302023-03-29T16:46:50+5:30

विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील तांदूळ, कडधान्याची चोरी करून काही वाहतूकदार, ठेकेदार गलेलठ्ठ झाले आहेत

Why is the administration ignoring the theft of school nutrition in sangli | सांगलीत शालेय पोषण आहारातील चोरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?

सांगलीत शालेय पोषण आहारातील चोरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील तांदूळ, कडधान्याची चोरी करून काही वाहतूकदार, ठेकेदार गलेलठ्ठ झाले आहेत. या चोरीबद्दल पुराव्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. तरीही ठेकेदार, पुरवठादारांवर कारवाई झाली नसल्यामुळे पोषण आहारातील चोरी आणखी वाढली आहे, असा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला आहे.

फराटे यांनी निवेदनात म्हटले की, जिल्ह्यासाठी पोषण आहार पुरवठ्याचा ठेका तासगाव तालुक्यातील एकाकडे आहे. ठेकेदार एका ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांना पोषण आहार पुरवठा करत आहे. यामध्ये ४० वाहने वज्रचौडे व आसपासच्या गावातील आहेत. ट्रान्स्पोर्टशी करार झालेला आहे. सदर टेम्पोमधून शाळांना पोषण आहार पुरवठा होत आहे. यामध्ये गहू, तांदूळ, हरभरा, मूगडाळ, तुरडाळ, मटकी, भगवती आदींचा समावेश आहे. सदर पुरवठा करताना वाहनांचे चालक पाइप मारून पोत्यातून पोषण आहाराची चोरी करत आहेत. शाळेत मुख्याध्यापक एकाच पोत्याचे वजन तपासून माल बरोबर असल्याचा सही-शिक्का करून देत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व माल वजन करून घेतल्यास ठेकेदाराची चोरी उघडकीस येणार आहे. पण, मुख्याध्यापकांकडून तसे होत नसल्याचा ठेकेदार व पुरवठादार गैरफायदा घेत आहेत. पोत्यातून काढलेला माल वाहतूकदार तासगाव तालुक्यातील बलगवडे आणि वायफळेजवळील गोडावूनमध्ये ठेवत आहेत. तेथून दोन खरेदीदार पोषण आहारातून चोरलेला माल कमी दराने खरेदी करून जादा दराने विक्री करत आहेत. आतापर्यंत या वाहतूकदारांनी दहा टन माल परस्पर विक्री केला आहे. जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांचा यात सहभाग असून त्यांनाही महिन्याला ठेकेदार हप्ते देत आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.

...अशी होते चोरी

वाहनांचे चालक पाइप मारून पोत्यातून गहू, तांदूळ, हरभरा, मूगडाळ, तुरडाळ, मटकी, भगवती बाजूला काढत आहेत. हा चोरीचा माल पुन्हा तासगाव तालुक्यातील बलगवडे व वायफळेजवळ एका खासगी गोडावूनमध्ये ठेवून त्याची विक्री होत आहे.

बोगसगिरी करणाऱ्याचा ठेका रद्द करा

एका बाजूला शाळेत तांदूळ नसल्यामुळे मुले पोषण आहारापासून वंचित आहेत. दुसऱ्या बाजूला पोषण आहारातील तांदूळ आणि कडधान्याची चोरी वाहतूकदारांकडून होत आहे. या प्रकरणास संबंधीत ठेकेदार जबाबदार असल्यामुळे त्याचा परवाना रद्द करावा, अशी मागणी फराटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Web Title: Why is the administration ignoring the theft of school nutrition in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली