वसंतदादा कारखान्याच्या कर्जाचा बाऊ कशाला?
By admin | Published: April 17, 2016 10:54 PM2016-04-17T22:54:08+5:302016-04-18T00:23:32+5:30
दिलीपतात्या पाटील : थकबाकी भरल्यानेच ते कर्जासाठी म्हणून पात्र
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने त्यांच्या यापूर्वीच्या कर्जाची सर्व थकित रक्कम भरली आहे. कर्ज भरणारा प्रत्येक कर्जदार हा पुढील कर्जासाठी पात्र ठरत असतो. त्यामुळे वसंतदादा साखर कारखान्याच्या नव्या कर्जमंजुरीचा बाऊ कशाला?, असा सवाल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी रविवारी उपस्थित केला.
ते म्हणाले की, बँकेने सध्या बँकिंग धोरणांचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात झाली आहे. नवे वित्तीय वर्ष सुरू झाल्याने बँकेकडील पैशातून व्याज स्वरुपात उत्पन्न सुरू करण्यासाठी नव्या कर्ज प्रकरणांच्या मंजुरीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एखादा शेतकरी जेव्हा त्याचे कर्ज व थकबाकी भरतो, तेव्हा तो नव्या कर्जासाठी पात्र होतो. बँकिंग क्षेत्राचा हा नियमच आहे. त्याचपद्धतीने एखादी अकृषिक संस्था त्यांचे खाते नियमित करीत असेल, तर त्यांना कर्जपुरवठा केलाच पाहिजे. वसंतदादा कारखान्याने यावेळी त्यांची सर्व थकबाकी भरलेली आहे. कारखाना थकबाकीत असता, तर त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर होऊ शकले नसते.
यापूर्वी ज्यावेळी कारखान्याचे खाते एनपीएमध्ये होते, त्यावेळी त्यांनी दिलेल्या कर्जप्रस्तावास आम्ही नकार दर्शविला होता. आता त्यांचे खाते नियमित झाल्याने नव्या कर्जासाठी ते पात्र ठरलेले आहे. कारखान्याला दिलेल्या नव्या कर्जातून पुन्हा व्याजस्वरुपात उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे यात बँकेचाच फायदा आहे. आशिया खंडातील हा सर्वात मोठा कारखाना असून त्यावर अनेक कामगारांचे जीवनही अवलंबून आहे. अशा मोठ्या संस्थेचे तसेच मोठा कर्जदार म्हणून त्यांचे हित पाहिल्यास, साहजिकच बँकेचाही त्यात फायदा आहे. त्यामुळे या कर्जप्रकरणाचा एवढा बाऊ करण्यात अर्थ नाही. बँकिंगच्या कारभाराचा हा भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)