शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणाऱ्यांच्या पदरात मतदानाचा दुष्काळ का?, ‘स्वाभिमानी’चा सवाल
By अविनाश कोळी | Published: June 11, 2024 05:45 PM2024-06-11T17:45:18+5:302024-06-11T17:45:47+5:30
निवडणुकीतील शेतकऱ्यांच्या भूमिकेने चळवळीतील कार्यकर्ते अस्वस्थ
सांगली : ऊस दरापासून बेदाण्याच्या प्रश्नापर्यंत शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येवर साखर सम्राट, सरकारी यंत्रणांशी संघर्ष करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदरात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा दुष्काळ वाट्याला आला. ज्यांच्यासाठी लढलो त्या शेतकऱ्यांची मते गेली कुठे? अन्याय करणाऱ्या साखर सम्राटांनाच मतांचे भरभरून दान का मिळाले? संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता निवडणूक लढवायची की नाही? असे मनाला अस्वस्थ करणारे सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी व सामान्य जनतेसमोर उपस्थित करून भावनांना वाट करून दिली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही काय गुन्हा केला म्हणून शेतकऱ्यांनी या लोकसभा निवडणुकीत आम्हाला शिक्षा दिली. मला सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत फक्त साडेपाच हजार मते पडली. एखाद्या पंचायत समितीच्या उमेदवारालाही यापेक्षा जास्त मते मिळतात.
निवडणुकीत साखर सम्राट निवडून आले आणि पराभूत झालेलेही साखर सम्राटच आहेत. मते मिळविण्यासाठी एकतर साखर सम्राट हवे किंवा वारसदार हवे, असा या निकालाचा अर्थ घायचा का? तुम्ही आमचे प्रश्न सोडवा पण मत मागायला येऊ नका, आम्ही तुम्हाला मत देणार नाही, आमचे मत आम्ही वाया घालवत नाही, असाच संदेश या निवडणुकीचा असावा, अशी आमची भावना झाली आहे.
राजू शेट्टींनाही का नाकारले?
हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांनाही मतदारांनी नाकारले. केवळ पावणे दोन लाख मते त्यांना पडली आहेत. जो उमेदवार पाच वर्षांत मतदारसंघात फिरकला नाही व ज्यांच्याविरोधात ‘खासदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा’ असे फलक लोकांनी लावले तेच निवडून आले. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्यांना का नाकारले गेले, याचे उत्तर सापडत नाही.
संघटनेचे शेतकरी मतदारांना सवाल
- ऊस दरासाठी गव्हाणीत उड्या मारल्या, हा गुन्हा केला का?
- बुडालेली ७० कोटींची ऊस बिले काढण्यासाठी संघर्ष केला. हा गुन्हा होता का?
- हजार रुपयांचा साखरेचा भाव तीन हजारांवर नेला, हा गुन्हा म्हणायचा का?
- बेदाण्याचा पोषण आहारात समावेश करण्यासाठी प्रयत्न केला, हाच गुन्हा का?
- कडकनाथ घोटाळाप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्या, हा गुन्हा केला काय?