दोन महिन्यांवर निवडणुका आल्या असताना राजीनाम्याची भाषा का?; अनिल बाबर यांचा संजय पाटीलांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 01:00 PM2023-11-27T13:00:08+5:302023-11-27T13:00:31+5:30
विटा : कृष्णा-कोयनेचे पाणी पाण्याच्या मार्गाने जाईल. पण, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना जरा भान ठेवा, नाहीतर आम्हालाही याबाबत गांभीर्याने घ्यावे लागेल, ...
विटा : कृष्णा-कोयनेचे पाणी पाण्याच्या मार्गाने जाईल. पण, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना जरा भान ठेवा, नाहीतर आम्हालाही याबाबत गांभीर्याने घ्यावे लागेल, असा इशारा देऊन पाण्याचा सर्व प्रश्न सुटला असताना आणि निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आल्या असताना आपल्याकडून राजीनाम्याची भाषा का ? असा सवाल करीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी खासदार संजय पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
शनिवारी खासदार संजय पाटील यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याने कोयनेचे पाणी सोडले जात नाही. आमदार बाबर मुख्यमंत्र्यांना फोन करतात आणि मग पाणी सुटते, हा काय प्रकार आहे ? असे प्रश्न उपस्थित करीत पाण्यासाठी प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देऊ, असा इशारा दिला होता. त्यानंतर रविवारी अनिल बाबर यांनी विट्यात पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्यावर निशाणा साधला.
बाबर म्हणाले, एकत्र सत्तेत असताना मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराबाबत बोलताना भान ठेवा. जपून बोला. अन्यथा आम्हाला गंभीर दखल घ्यावी लागेल. पाणी पाण्याच्या मार्गाने जाईल. तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल, पाण्याचे कारण कशाला ? राजीनामा देण्याचे कारण काही वेगळे असेल तर आवश्य राजीनामा द्या. पण, अवघ्या दोन महिन्यांवर निवडणुका झाल्या असताना आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असताना राजीनामा देण्याची भाषा न समजण्याइतपत जनता दूधखुळी नाही. आम्ही कोणत्याही परिणामांची पर्वा न करता तुम्हाला सत्तेत येण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे सरकार चालविण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
गेल्या १० ते १२ दिवसांपासून कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्यानंतर कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत होते. जनतेसाठी महत्त्वाचा प्रश्न असल्याने सर्वांचेच प्रयत्न सुरू होते. या दरम्यान, खासदार संजय पाटील यांचा मला फोन आला होता. तुम्ही मुख्यमंत्री शिंदे आणि साताऱ्याचे पालकमंत्री देसाई यांच्याशी बोला. आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो, असे ते म्हणाले.
यानंतर आम्ही आमच्या पातळीवर प्रयत्न करून मुख्यमंत्री शिंदे आणि देसाई यांच्याशी बोलून प्रश्न मार्गी लावला. यानंतर पाणी सोडण्यात आले. आता सगळं झाल्यावर संजय पाटील टीका करीत आहेत. पाण्याचा त्यांचा अभ्यास आहे. त्यांची बोलण्याची पद्धत तशी आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पण, मुख्यमंत्री आणि सरकारमधील मंत्र्यांवर बोलताना भान ठेवले पाहिजे.