विरोधकांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातच दंगली कशा?, जयंत पाटलांचा सवाल

By अविनाश कोळी | Published: June 13, 2023 04:57 PM2023-06-13T16:57:46+5:302023-06-13T16:59:00+5:30

राज्यातील दंगलींचा घटनाक्रम पाहिला तर संशय यावा, अशी परिस्थिती

Why the riots in the constituency dominated by the opposition, NCP leader Jayant Patil question | विरोधकांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातच दंगली कशा?, जयंत पाटलांचा सवाल

विरोधकांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातच दंगली कशा?, जयंत पाटलांचा सवाल

googlenewsNext

सांगली : राज्यातील दंगलींचा घटनाक्रम पाहिला तर संशय यावा, अशी परिस्थिती आहे. ज्या मतदारसंघात विरोधी पक्षांचे वर्चस्व आहे, तिथेच दंगली का होताहेत? का त्या घडविल्या जात आहेत, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

ते म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर दंगली होत असताना गृहखाते त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. आजवर ज्या शहरांमध्ये दंगली झाल्या त्या शहरांत कुठेही भाजप किंवा शिंदे गटाचे वर्चस्व नाही. केवळ विरोधी पक्षांच्या मतदारसंघातच त्या घडताना दिसतात. त्यामुळे यात कोणाचा हात आहे, याची चौकशी झाली पाहिजे. गृहखात्याला या गोष्टीचे गांभीर्य असेल व त्यांनी एखादी बैठक बोलावली तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांना सर्व ते सहकार्य करु.

ब्रिटीश, मघुलांच्या काळातही वारीवर हल्ला झाला नाही

वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याबाबत ते म्हणाले की, गेल्या तिनशे वर्षात ब्रिटीश आणि मघुलांच्या काळातही वारीवर कधीही हल्ला झाला नाही. मात्र, या सरकारच्या काळात वारकऱ्यांवर हल्ला झाला. ज्यांच्यावर लाठी उगारली पाहिजे ते राहिले बाजूला आणि वारकऱ्यांवर लाठी उगारली जाते. असा प्रकार घडला नसल्याचा दावा सरकार करीत असले तरी प्रत्यक्षात ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. शांततेच्या मार्गांनी परंपरा जपणाऱ्यांवर असा हल्ला होणे ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता या घटनेने अस्वस्थ आहे.

...तर एकनाथ शिंदेंना नेतृत्व द्या

भाजपने जाहिरातीत दिलेल्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना अधिक पसंती असेल, तर भाजपने त्यांचे ऐकावे आणि शिंदेंना पूर्ण नेतृत्व द्यावे. शिंदे गटाला जितक्या जागा हव्या आहेत, त्यांना तेवढ्या द्याव्यात, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.

सत्ताधाऱ्यांचा टिकाव लागणार नाही

सर्व्हेची गोष्ट बाजुला केली व वास्तव पाहिले तर पुढील निवडणुकांत महाविकास आघाडीसमोर भाजप किंवा शिंदे गटाचा निभाव लागणार नाही. महाविकास आघाडी एकसंध झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली आहे.

Web Title: Why the riots in the constituency dominated by the opposition, NCP leader Jayant Patil question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.