गव्हर्न्मेंट काॅलनीतील तीन रस्त्यांचे रुंदीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:21 AM2021-01-09T04:21:13+5:302021-01-09T04:21:13+5:30
सांगली : गव्हर्न्मेंट काॅलनी परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या परिसरात महत्त्वाची शासकीय कार्यालये असल्याने वाहनांचीही वर्दळ असते. ...
सांगली : गव्हर्न्मेंट काॅलनी परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या परिसरात महत्त्वाची शासकीय कार्यालये असल्याने वाहनांचीही वर्दळ असते. त्यासाठी या परिसरातील तीन रस्त्यांचे रुंदीकरण करून पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे निवदेनाद्वारे केली आहे.
गायकवाड म्हणाले की, कोल्हापूरकडून येणारी वाहने विजयनगर चौकातूनच पास होत आहेत. त्यात या परिसरात शासकीय कार्यालय, न्यायालय, महाविद्यालय, मोठी रुग्णालये आहेत. त्यातच या परिसरात अरुंद रस्ते आहेत. परिणामी वाहतुकीला अडचण होऊन अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यासाठी विश्रामबाग ते इनामधामणी, विजयनगर ते अंकली रोड व गव्हर्न्मेंट काॅलनी ते हसनी आश्रम हे तीन रस्ते पूर्ण क्षमतेने विकसित केले पाहिजेत. हे तीनही रस्ते ६० ते ८० फुटी आहेत. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला एलईडी दिवेही बसविण्याची गरज आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल, असेही ते म्हणाले.