सांगलीत विधवा महिलांनी केले वडपूजन, सुवासिनींकडूनही मिळाला कुंकवाचा मान
By अविनाश कोळी | Published: June 21, 2024 04:30 PM2024-06-21T16:30:14+5:302024-06-21T16:31:16+5:30
सांगली : वटपौर्णिमेचे नाते परंपरेने सुवासिनींशी जोडले आहे. मात्र, परंपरेच्या या धाग्यात विधवा महिलांनाही गुंफत त्यांनाही वडपूजनाचा व हळदी-कुंकूचा ...
सांगली : वटपौर्णिमेचे नाते परंपरेने सुवासिनींशी जोडले आहे. मात्र, परंपरेच्या या धाग्यात विधवा महिलांनाही गुंफत त्यांनाही वडपूजनाचा व हळदी-कुंकूचा मान देण्याचा उपक्रम सांगलीत राबविण्यात आला. सुवासिनींनीही विधवा महिलांना सन्मान देत त्यांच्या कृतीचा आदर केला.
सांगलीच्या सितारामनगरमध्ये एका उद्यानात हा अनोखा कार्यक्रम पार पडला. येथील सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता पत्की यांनी विधवा महिलांचे संघटन करुन ‘सुवासिनी’ नावाचा ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून विधवा महिलांना समाजात सन्मान प्राप्त करुन देण्याची चळवळ राबविली जाते. यापूर्वीही संक्रांतीच्या सणावेळी हळदी-कुंकू व वाण देऊन विधवा महिलांना मान-पानाचा गोडवा दिला होता.
वटपोर्णिमेच्या निमित्ताने प्रथमच विधवा महिलांना वडपूजनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. शहरातील सुमारे ५०० विधवा महिलांना निमंत्रण देण्यात आले होते. परंपरेचे बंध तोडत सणाच्या मानाचा धागा हाती घेण्यासाठी २५ महिला जमल्या. त्यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता वडाच्या झाडाचे पूजन केले. याठिकाणी जमलेल्या सुवासिनींनीही त्यांचे स्वागत करीत त्यांना हळदी-कुंकूचा मान दिला. त्यांच्या कृतीचा आदर केला. त्यामुळे विधवा महिला या उपक्रमाने भारावून गेल्या. सुवासिनींइतकाच मान त्यांना देण्यात आला. कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र घालून सुवासिनींप्रमाणे विधवा महिलांनी सहभाग नोंदविला.
वडाच्या झाडाला समानतेचे दोर
ऑक्सिजनचा मोठा स्रोत म्हणून वडाच्या झाडाकडे पाहिले जाते. ऑक्सिजन देताना हे झाड कधी भेदभाव करीत नाही. मग, माणसांनीच महिलांमध्ये भेदाच्या भिंती उभ्या केल्या. त्या भींती तोडण्यासाठी व वटवृक्षाच्या नियमाप्रमाणे समानतेचे दोर बळकट करण्यासाठी उपक्रम राबविल्याचे आयोजक अस्मिता पत्की यांनी सांगितले.
तीन वर्षांपूर्वी कोरानाने माझ्या पतीचा मृत्यू झाला. विधवा महिलेचे दु:ख मी जाणते. सण, परंपरेत विधवांना मान मिळत नसल्याने महिलांचे खच्चीकरण होते. अशा खचलेल्या सर्व महिलांसाठी आशेची नवी खिडकी खोलावी म्हणून एक चळवळ उभी केली. वटपोर्णिमेला विधवा महिलांच्या या कृतीचे सुवासिनींनी स्वागत केल्याने आम्ही आनंदी आहोत. - अस्मिता पत्की, अध्यक्षा, सुवासिनी ग्रुप, सांगली