बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना पंधरा दिवसांत प्रत्येकी दोन लाख रुपये देणार - मंत्री मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 05:56 PM2022-05-23T17:56:24+5:302022-05-23T17:56:50+5:30
विधवा महिलांची एकूण ३७ प्रकरणे तातडीने कल्याणकारी मंडळाकडे पाठविण्याचा निर्णय यावेळी झाला. पंधरा दिवसांत पैसे मिळतील, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.
सांगली : मृत बांधकाम कामगारांच्या ३७ विधवा महिलांना येत्या पंधरा दिवसांत शासनाच्या योजनेनुसार प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यात येतील, असे आश्वासन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी बैठकीत प्रकरणनिहाय सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात आले.
संघटनेचे नेते कॉ. शंकर पुजारी यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने मुश्रीफ यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मृत बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना योजनेंतर्गत आर्थिक मदत मंजूर असूनही त्यांना मिळत नसल्याबाबत तक्रार करण्यात आली. विधवा महिलांची एकूण ३७ प्रकरणे तातडीने कल्याणकारी मंडळाकडे पाठविण्याचा निर्णय यावेळी झाला. पंधरा दिवसांत पैसे मिळतील, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.
मिरज येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या २४० घरकुलांपैकी ९० घरांचे नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी बुकिंग केले आहे. त्यांना कल्याणकारी मंडळामार्फत दोन लाख रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव सांगलीच्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी त्वरित पाठवावा, असा आदेश मुश्रीफ यांनी दिले.
बांधकाम कामगार मुलींच्या विवाहासाठी ५१ हजार रुपये देण्याची तरतूद दोन मुलींपर्यंत वाढवण्यात यावी, पूरग्रस्त भागातील बांधकाम कामगारांच्या घरकुलांची यादी त्वरित मंजूर करावी आदी मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही मुश्रीफ यांनी दिले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस प्रा. शरयु बडवे व संघटनेचे सचिव कॉ. विशाल बडवे उपस्थित होते.