साबण आणून देऊन दमताय का? पत्नीने पक्कडने पतीचा अंगठा फोडला, सांगलीतील घटना
By संतोष भिसे | Published: May 14, 2024 06:34 PM2024-05-14T18:34:28+5:302024-05-14T18:35:10+5:30
सांगली : बाथरुममध्ये अंघोळीचा साबण कुठे ठेवलाय? असे विचारले म्हणून पती-पत्नीत उद्भवलेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. पतीने पत्नीच्या थोबाडीत ...
सांगली : बाथरुममध्ये अंघोळीचा साबण कुठे ठेवलाय? असे विचारले म्हणून पती-पत्नीत उद्भवलेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. पतीने पत्नीच्या थोबाडीत मारली, तर पत्नीने पक्कडने पतीचा अंगठा फोडला. यासंदर्भात पतीच्या फिर्यादीवरुन पत्नीसह सासरच्या चौघांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सांगलीत संजयनगर येथे पाटणे प्लॉटमध्ये ८ मे रोजी दुपारी एक वाजता ही घटना घडली. पोलिस ठाण्यात १३ मे रोजी गुन्हा दाखल झाला. अशोक मारुती चौगुले (वय २५, रा. इंगळे गल्ली, पाटणे प्लॉट, संजयनगर, सांगली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांची पत्नी विद्या (वय १९), सासरा बाळू आप्पा कोळेकर, सासू लक्ष्मी, चुलत सासरा ज्ञानू आप्पा कोळेकर (सर्व रा. पाटणे प्लॉट, संजयनगर) यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले.
अशोक हमाली करतात. पत्नी व सासरच्या नातेवाईकांसोबत एकत्र राहण्यास आहेत. ८ मे रोजी सकाळी पत्नी विद्या अंघोळीसाठी स्वच्छतागृहात जाताना तिने पतीला साबण कुठे आहे? अशी विचारणा केली. त्यावर अशोक यांनी साबण बाथरुममध्ये असेल, जाऊन बघ असे सांगितले. तेव्हा विद्या हिने पतीला अपशब्द वापरले. तुम्ही मला साबण आणून देऊन दमताय का? अशी प्रतिविचारणा केली. त्यावरुन पती-पत्नीत वाद झाला.
अशोकने विद्याला शिवी दिली, तर विद्याने अशोकच्या हाताच्या अंगठ्यावर पक्कडने वार केला. या भांडणावेळी सासू, सासरे, चुलत सासरे यांनीही अशोकला दमदाटी केली. मुलीला त्रास देतोस, तुला सोडतच नाही असे धमकावले. अशोकच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हे दाखल केले.