कवलापुरात पत्नी-मुलीस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:40+5:302021-06-06T04:19:40+5:30
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे किरकोळ वादातून संशयित बंडोजी महादेव पाटील (वय ४२, रसूलवाडी रस्ता, कवलापूर) याने पत्नी ...
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे किरकोळ वादातून संशयित बंडोजी महादेव पाटील (वय ४२, रसूलवाडी रस्ता, कवलापूर) याने पत्नी लीला (३७) आणि मुलगी वैष्णवी या दोघींना कुदळीच्या दांड्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी लीला पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंडोजी याने चार दिवसांपूर्वी मुलगी वैष्णवी हिच्याकडून मोबाईल काढून घेतला होता. तो लीला यांनी परत मागितला. त्यामुळे बंडोजीला राग आला. त्याने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. यावेळी मुलगी वैष्णवी आईला सोडवण्यास धावली. बंडोजी याने कुदळीचा दांडा काढून पत्नी व मुलगी या दोघींनाही मारहाण केली. दोघींच्या पाठीत व कंबरेत दांड्याने हल्ला केल्याने त्या जखमी झाल्या. उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
--------------------
सांगलीत एकास शिवीगाळ व मारहाण
सांगली : विश्रामबाग लिमये मळ्यात स्वप्नपूर्ती अपार्टमेंट या सदनिकेच्या बैठकीत विश्वनाथ प्रभूदेसाई यांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी पवार (पूर्ण नाव नाही) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पूजा विश्वनाथ प्रभूदेसाई यांनी फिर्याद दिली आहे. स्वप्नपूर्ती अपार्टमेंटच्या टेरेसवर आयाेजित बैठकीत फ्लॅट नं. ६ मधील पवार नामक संशयित तेथे आला. त्यांनी विश्वनाथ प्रभूदेसाई यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच मारहाण करून जखमी केले. इतरांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. त्यानंतर पूजा प्रभूदेसाई यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
------------------
वखारभागात तीन दुकाने फोडलीे
सांगली : येथील वखारभाग परिसरात रात्रीत तीन दुकाने फोडल्याचा प्रकार घडला. रोख रक्कम, चांदीची नाणी व शेंगतेलाचा डबा असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या तिन्ही चोऱ्यांबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे. अभिजित आदगोंडा पाटील (३३) यांचे वखारभागात हुतात्मा बँकेजवळ आदिनाथ ट्रेडर्स दुकान आहे. चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून रोख ३५०० रुपये व चार चांदीची नाणी असा ३ हजार ९०० रुपयाचा ऐवज पळवला. परिसरातील सुरेश आण्णासाहेब पाटील (वय ७१) यांचे नेमिनाथ ट्रेडिंग कंपनी हे दुकान फोडून रोख ८५० रुपये व शेंगतेलाचा डबा असा ३३५० रुपयाचा मुद्देमाल लांबवला. तसेच जैनबस्तीजवळील विलास चतुरलाल शहा (वय ७२) यांच्या शहा पाटील ॲन्ड कंपनी या दुकानाचा कडी-कोयंडा उचकटून रोख ४५०० रुपये आणि गोदामाच्या दोन किल्ल्या, कागदपत्रे लांबवली. सकाळी सहाच्यासुमारास चोऱ्या झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिन्ही दुकानाच्या मालकांनी शहर ठाण्यात फिर्याद दिली.
------------------
नावरसवाडीत अपघातप्रकरणी गुन्हा
सांगली : नावरसवाडी (ता. मिरज) येथे भरधाव वेगाने मोटार चालवून रिक्षाचालकास जखमी केल्याप्रकरणी मोटारचालक विवेक उत्तम चव्हाण (रा. सांगली) याच्याविराेधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी रिक्षाचालक अमोल अण्णासाहेब पवार (वय ४४, खणभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. पवार आणि त्यांचा मित्र अजय हे दोघेजण रिक्षामधून (क्र. एमएच १० सीक्यू ११८८) नांद्रे येथे शेंगदाणे बी आणण्यासाठी गेले हाेते. बियाणे घेऊन परत येत असताना नावरसवाडी फाट्याजवळ सोनपरी हॉटेलसमोर मोटारीने (क्र. एमएच १० बीझेड २१२४) रिक्षाला धडक दिली. धडकेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. तसेच रिक्षा व मोटारीचे नुकसान झाले. जखमी पवार यांनी मोटारचालक चव्हाण याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.