देशातील चेकपोस्ट बंदसाठी लढा उभारणार, अमृतलाल मदान 

By अशोक डोंबाळे | Published: August 30, 2023 11:51 AM2023-08-30T11:51:26+5:302023-08-30T11:52:19+5:30

सांगलीतील वाहतूकदारांच्या राष्ट्रीय अधिवेशनात निर्णय

Will build a fight for check post ban, Decision at National Convention of Transporters in Sangli | देशातील चेकपोस्ट बंदसाठी लढा उभारणार, अमृतलाल मदान 

देशातील चेकपोस्ट बंदसाठी लढा उभारणार, अमृतलाल मदान 

googlenewsNext

सांगली : देशभरातील वाहतूकदारांना चेकपोस्टचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. मध्य प्रदेशात नेटाने त्याविरोधात लढा उभा केला आणि तो यशस्वी करून दाखवला आहे. आता तोच लढा देशभर यशस्वी करण्यात येणार आहे. त्रास होईल, मात्र यश नक्की मिळेल, असा विश्वास अखिल भारतीय मोटार वाहतूकदार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमृतलाल मदान यांनी व्यक्त केला.

जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे सांगलीत मंगळवारी अखिल भारतीय मोटार वाहतूकदार काँग्रेसच्या ‘उमंग’ या राष्ट्रीय अधिवेशनात अमृतलाल मदान बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मोटार वाहतूकदार काँग्रेसचे राष्ट्रीय चेअरमन जी. आर. श्णमुग्गाप्पा, उपाध्यक्ष अरविंद अप्पाजी, कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मलकितसिंग, अर्थ समितीचे पी. सुंदरराज, माजी उपाध्यक्ष प्रकाश गवळी, मध्यप्रदेशचे अध्यक्ष विजय कालरा, जनरल सेक्रेटरी सुरेश खोसला, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, मावळते जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी, नूतन जिल्हाध्यक्ष सुरेंद्र बोळाज आदी प्रमुख उपस्थित होते.

मदान म्हणाले, आपणासाठी कुठलीही लढाई सोपी कधीच नसते. त्याचे चांगले वाईट परिणाम होत असतात. हक्कासाठी लढत राहिले पाहिजे. वाहतूकदार हा सहनशील घटक असल्याने त्याची सतत कोंडी केली आहे. त्यातून आपण लढून सुटका करून घेतली पाहिजे. या लढ्यात सर्वांनी संघटित लढल्यास निश्चित यश मिळत आहे.

राज्याचे नेते प्रकाश गवळी म्हणाले, केंद्र आणि राज्य शासन वाहतूकदारांकडून टोल वसूल करत आहे; पण वाहतूकदारांना तेवढ्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्याबाबतचे नियम सगळे गुंडाळून ठेवले गेले आहे. त्याविरोधात भांडावे लागणार आहे.

जी. आर. श्णमुग्गाप्पा म्हणाले, असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी एकजुटीने आपली ताकद दाखविली पाहिजे. वर्तमानकाळातील स्थिती पाहता लढायला नेहमी सज्ज असले पाहिजे. महाराष्ट्रातील कोंडी फोडायला ताकद लावा, राष्ट्रीय संघटना पूर्ण ताकद देईल. असोसिएशनचे बाळासाहेब कलशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. जयंत सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

ट्रक वाहनतळाचे बापूसाहेब पाटील असे नामकरण

जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सांगलीतील ट्रक वाहनतळाचे स्वातंत्र्यसैनिक स्व. बापूसाहेब अण्णासो पाटील असे नामकरण केंद्रीय माजी मंत्री प्रतीक पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सुरेश पाटील, प्रशांत मजलेकर, धीरज सूर्यवंशी यांच्या उपस्थित झाले.

जीवनगौरवने सन्मान

बापूसाहेब पाटील, बापूसाहेब मगदूम, अशोक भोसले, विष्णुपंत म्हमाणे यांना मरणोत्तर जीवनगौरव, तर विजय शाह, मनजीत भाटिया, दिलीप शाह, मोहन जोशी, संभाजी तांबडे, बापूसाहेब तोडकर, हिराचंद शाह, गोपाळ कंदोई, अजित शाह, रवींद्र बुकटे, भाऊसाहेब पाटील, शिवाजी शिंदे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुरेंद्र बोळाज नवे अध्यक्ष

बाळासाहेब कलशेट्टी यांच्यानंतर आता नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेंद्र बोळाज यांनी सूत्रे हाती घेतली. चेक पोस्टला विरोधाचा श्रीगणेशा सांगलीतून करतोय, अशी घोषणा त्यांनी केली. महेश पाटील यांच्याकडे उपाध्यक्षपद सोपवण्यात आले. नव्या संचालक मंडळाने मान्यवरांच्या उपस्थितीत शपथ घेतली. मावळते अध्यक्ष कलशेट्टी यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. पत्नी  सुजाता, मुलगा तेजससह त्यांनी ते स्वीकारले.

Web Title: Will build a fight for check post ban, Decision at National Convention of Transporters in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली