आव्हानात्मक प्रभागामधूनच लढणार;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:03 AM2020-12-05T05:03:48+5:302020-12-05T05:03:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहर सुधार समिती, विकास आघाडीतून जे जे लढले आणि हरले, त्यांना आगामी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहर सुधार समिती, विकास आघाडीतून जे जे लढले आणि हरले, त्यांना आगामी पालिका निवडणुकीत सुरक्षित प्रभाग देऊन निवडून आणण्याची जबाबदारी गटनेता म्हणून विक्रमभाऊ पाटील यांनी स्वीकारली आहे. स्वत:साठी मात्र आव्हानात्मक प्रभागातच निवडणूक लढविण्याचा पाटील यांनी निर्धार केला आहे.
इस्लामपूर पालिकेत तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीची ३१ वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात विकास आघाडीला मोठे यश मिळाले. त्यातील खारीचा वाटा विक्रमभाऊ पाटील यांचाही आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गटनेता आणि पक्षप्रतोदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु काही दिवसातच सत्ताधारी विकास आघाडीतील काही नेते आणि त्यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळे पाटील यांनी आपला सवतासुभा मांडला. त्यांनी त्यांच्या ताकदीवर प्रभाग तीन व पाचमध्ये १८ कोटींचा निधी आणून रस्त्यांचे नियोजन केले आहे. इतर विकास कामांसाठीही निधी उपलब्ध करण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले आहेत.
ते गेल्या १४ वर्षांहून अधिक काळ पालिकेच्या राजकारणात आहेत. विविध आंदोलने, प्रवासी वाहतूक संघटनेचे नेतृत्व करून त्यांना न्याय देण्याचे कामही त्यांनी केले आहे. एकंदरीत राष्ट्रवादीविरोधात विरोधकांची एकत्रित फळी करून लढण्याचा त्यांचा निर्धार असला तरी, त्यांना अंतर्गत विरोध करणारे नेते कितपत साथ देणार, यावरच आगामी पालिका निवडणुकीचे रणांगण ठरणार आहे.
कोट
निवडून आल्यापासून गेल्या चार वर्षांत प्रभागातील विकासकामे मार्गी लावली आहेत. पहिल्यापासून प्रभागातील संपर्क, सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविल्यामुळे भाजपच्या माध्यमातून आगामी निवडणूक सोपी जाईल. गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादीविरोधात आमच्याकडून लढले आणि हरले, त्यांना प्राधान्य देऊन उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- विक्रमभाऊ पाटील, गटनेते, विकास आघाडी, इस्लामपूर नगरपरिषद
०२११२०२०-आयएसएलएम-विक्रमभाऊ पाटील