मसुचीवाडीत गुरू-शिष्य एकत्र येणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:42 AM2020-12-15T04:42:46+5:302020-12-15T04:42:46+5:30
बोरगाव : मसुचीवाडी (ता. वाळवा) ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. १५ जानेवारीला मतदान हाेत असून, सरपंचपद खुले व्हावे, यासाठी ...
बोरगाव : मसुचीवाडी (ता. वाळवा) ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. १५ जानेवारीला मतदान हाेत असून, सरपंचपद खुले व्हावे, यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. ग्रामपंचायतीची लढत एकेकाळच्या गुरू-शिष्यात होणार की, गुरू-शिष्य एकत्र येऊन हुतात्मा गटास टक्कर देणार, याकडे राजकीय धुरिणांच्या नजरा लागल्या आहेत.
अवघे चार वाॅर्ड असणाऱ्या मसुचीवाडीत १२ जागांसाठी लढत होते; पण या गावाच्या राजकारणाची ख्याती जिल्हाभर आहे. गावात पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तूआप्पा खोत यांची जनसेवा आघाडी पार्टी व माजी सरपंच सर्जेरावबापू कदम यांची ग्रामविकास पॅनेल असे दोन पारंपरिक गट आहेत. दाेन्ही गट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मानणारे आहेत. दाेन्ही नेते नात्याने गुरू-शिष्य; पण आजमितीला एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. कार्यकर्तेही कट्टर आहेत. एकमेकांच्या आनंदात अथवा दुःखद प्रसंगातही सहभागी हाेत नाहीत. यामुळेच हे गाव राजकारणासाठी जिल्हाभर परिचित आहे. मात्र यावेळी गावात राजकीय समीकरण बदलत आहे. हुतात्मा गटाची कट्टर तिसरी पार्टी अस्तित्वात आली आहे. जयंत पाटील गट व हुतात्मा गटाचे विळ्या-भोपळ्याचे सख्य अख्ख्या जिल्ह्याला परिचित आहे. त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध होणारच नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे.
सध्या दत्तूआप्पा खोत यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे आप्पांच्या पार्टीची मदार सर्जेरावबापूंकडे देऊन ही निवडणूक जयंत पाटील एकत्र लढायला लावतील, अशी चर्चा आहे. दुसरीकडे हुतात्मा गटाने निवडणुकीची संपूर्ण तयारी केली आहे. याशिवाय रयत क्रांती आघाडीचे जिल्हाध्यक्ष भास्कर कदम काय निर्णय घेतात? यावरही या गावातील राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. वाॅर्डनिहाय आरक्षण पूर्ण झाले आहे. सरपंच आरक्षणाकडे गावाच्या नजरा लागल्या आहेत. सरपंचपद खुले हाेणार, या अपेक्षेने अनेकांनी देव पाण्यात घालून गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
दत्तूआप्पा गटाकडून संजय खोत, सुरेश कदम, प्रकाश माने, उध्दव कदम, सर्जेरावबापू गटाकडून वसंत कदम, प्रशांत कदम, दादासाहेब कदम, तर हुतात्मा गटाकडून विद्यमान सरपंच सुहास कदम, माजी उपसरपंच संभाजी कदम यांनी तयारी चालविली आहे. यामुळे सध्या सर्वांचे लक्ष राजकीय घडामोडींकडे लागून राहिले आहे.