पाण्यासाठी गाव करील ते राव करील काय?
By admin | Published: March 8, 2016 12:02 AM2016-03-08T00:02:48+5:302016-03-08T00:40:08+5:30
पुणदी ग्रामस्थांचा रोल मॉडेल : कोरड्या तलावांना पाण्याची प्रतीक्षा; राजकीय इच्छाशक्तीचा अभाव--लोकमत विशेष
दत्ता पाटील-- तासगाव
पाणी योजनांचा नियोजनहीन कारभार, लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीचा अभाव आणि जनतेच्या उदासीनतेमुळे तालुक्याच्या माथी असलेला दुष्काळाचा कलंक कायम आहे. तालुक्यातील पाणी योजनांवर कोट्यवधींचा झालेला खर्चदेखील कुचकामी ठरत आहे. पाणी योजना पायशाला असूनदेखील तालुक्यातील कोरड्या तलावांना पाण्याची प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीत पुणदीच्या ग्रामस्थांनी ‘गाव करील ते राव करील काय?’ याचे प्रत्यंतर देत, पाणी योजनेच्या बाबतीत रोल मॉडेल केले आहे. त्यामुळे कोरड्या तलावांना पुणदी तलाव अपवाद ठरला आहे.
तासगाव तालुक्यात ताकारी, आरफळ, म्हैसाळ, विसापूर, पुणदी या उपसा सिंंचन योजनांनी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या. या योजनांसाठी कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी या योजना बेभरवशाच्याच ठरल्या. त्यामुळे योजना असूनही त्याचा लाभ मिळाला नाही. विसापूर-पुणदीसारखी दुष्काळी भागाला दिलासा देणारी महत्त्वाकांक्षी योजना सुरु झाल्यानंतरही दुष्काळाचे चित्र पालटले नाही. योजना असूनही या योजनांतून निश्चित स्वरुपात पाणी केव्हा येणार? याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. बागायती क्षेत्राला आवश्यकता असतानादेखील या योजना उपयोगी पडल्या नाहीत, हे या योजनांचे भीषण वास्तव आहे.
तालुक्यात एक मध्यम प्रकल्प आणि सहा लघु प्रकल्प तलाव आहेत. सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत पुणदी तलावाचा अपवाद वगळता सर्वच तलाव कोरडे पडलेले आहेत. यापैकी पेड, अंजनी, सिध्देवाडी, लोढे या तलावांवर काही गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. तलावातच पाणी नसल्यामुळे या तलावांवर अवलंबून असलेल्या गावांत पिण्याच्या पाण्यासाठीदेखील टँकर सुरु करण्यात आले आहेत. सर्व तलावांच्या लाभक्षेत्राखाली असलेली दोन हजार हेक्टर शेती दुष्काळाच्या जबड्यात आहे. त्यामुळे पाणी योजना असूनदेखील पुणदी वगळता सर्व तलाव पावसाच्या भरवशावरच अवलंबून आहेत.
तालुक्यातील सर्वच तलाव पाणी योजनांतून भरता येऊ शकतात. याबाबत पाटबंधारे विभागाकडूनही नियोजन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत आणि राजकीय श्रेयवादाच्या महत्त्वाकांक्षेतून पेड, लोढे आणि सिध्देवाडी तलावात पुणदी योजनेचे पाणी सोडण्याचे सोपस्कार करण्यात आले होते. मात्र पाणी योजनेच्या अधिकाऱ्यांचा नियोजनशून्य कारभार आणि लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीचा अभाव या यामुळे ऐन दुष्काळातही बहुतांश तलाव कोरडे आहेत.
शासन आणि प्रशासनाने कायमस्वरुपी तोडगा काढल्यास, तलाव भरण्यासाठी पुढील वर्षभराचे नियोजन केल्यास, शेतकऱ्यांकडूनही पुणदीकरांसारखा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळू शकतो. किंंबहुना राजकारणाची झूल बाजूला ठेवून केवळ अधिकाऱ्यांकडून पाण्याची शाश्वती मिळाली, तर ‘गाव करील ते राव करील काय?’ याचा प्रत्यय सर्वच गावांतून येऊ शकतो.
कोण, काय म्हणाले?
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारामुळे दीड वर्षापूर्वी ताकारी योजनेचे पाणी पुणदी तलावात सोडण्यात आले होते. त्यानंतर तलावात पाणी सोडण्यासाठी ग्रामपंचायतीकडून मागणी करण्यात आली. ग्रामपंचायतीकडून पाण्याची मागणी करतानाच पाणीपट्टी भरण्यात येते. त्यामुळे ताकारी योजनेचे आवर्तन सुरु होण्यापूर्वी अधिकाऱ्यांकडून मागणीची विचारणा होते. पाण्याची शाश्वती मिळाल्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. हक्काचे पाणी मिळत असल्याने पाणीपट्टी गोळा करताना कोणतीही अडचण येत नाही.
- रवी पाटील सरपंच, ग्रामपंचायत, पुणदी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मांजर्डे येथील पाणी परिषदेनंतरच खऱ्याअर्थाने तालुक्यातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. मात्र सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार आणि प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार यामुळेच पाणी योजना कुचकामी ठरत आहेत. आमदार आणि खासदारांकडून केवळ श्रेयवादाचे नारळ फोडून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. शेतकऱ्यांना पाण्याची निश्चित शाश्वती मिळायला हवी. त्यासाठी पुढील काळात स्वाभिमानी संघटना आंदोलन करेल. पाण्यासाठी संघटनेकडून पाठपुरावा केला जाईल.
- महेश खराडे, प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना
काय आहे पुणदीचे मॉडेल
दीड वर्षापूर्वी आॅगस्ट २०१५ मध्ये ताकारी योजनेचे पाणी पुणदीच्या तलावात सोडण्यात आले. त्यावेळी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला. या तलावाचा लाभ परिसरातील १९४ हेक्टर शेतीला झाला. किंंबहुना पुणदीसह इतरही गावांच्या पिण्याच्या पाणी योजनांचा प्रश्नही मार्गी लागला. तासगाव बाजार समितीचे संचालक आणि पुणदीचे सरपंच रवी पाटील यांनी पुढाकार घेत दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी गावकऱ्यांची मोट बांधली. लोकवर्गणी गोळा करुन हिशेबानुसार पाणी बिल वेळोवेळी भरण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आजअखेर पुणदी तलाव सातत्याने भरलेला आहे. ग्रामपंचायतीकडून तलाव भरण्यासाठी पाण्याची मागणी केल्यानंतर, पाणी येण्यापूर्वी ठरलेली रक्कम अगोदर भरली जाते. आतापर्यंत मागणीनुसार २०१४-१५ मध्ये एकवेळ, १५-१६ मध्ये खरीप आणि रब्बी हंगामात दोनवेळा आणि दोन दिवसांपूर्वी रब्बी हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात एक वेळ असे पाचवेळा पाणी मिळाले आहे.
माळरानाचे झाले नंदनवन
सर्व पाणी दशलक्ष घनफुटानुसार मोजून घेतले जात असून, अॅडव्हान्समध्ये शेतकऱ्यांकडूनही उत्स्फूर्तपणे पाणीपट्टी भरली जात आहे. त्यामुळे पुणदी परिसरातील माळरानाचेदेखील नंदनवन झाले असून, गाव करील ते राव करील काय? याचे प्रत्यंतर पाहायला मिळत आहे.