महाराष्ट्राचे नाव गुजरात करणार की काय?, उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 11:43 AM2024-05-03T11:43:30+5:302024-05-03T11:44:27+5:30
'विश्वजीत'साठी सांगली सोडली असती
सांगली : महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला नेले, वित्तीय केंद्र गुजरातला नेले, तरीही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा तर ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है, असे म्हणत आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे नाव आता गुजरात करणार की काय? असा सवाल उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना केला. तसेच देशात इंडिया आघाडीला तीनशेहून अधिक जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सांगलीतील नेमीनाथनगर येथील मैदानात गुरुवारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. सभेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उद्धवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, मिलिंद नार्वेकर, संजय पवार, अभिजित पाटील, प्रा. सुकुमार कांबळे, शकील फिरजादे, संजय विभुते, बजरंग पाटील आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, कर्ज वाढलं, गॅस महाग झाला, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी निवडणूक रोखे घेऊन भाजपचे उत्पन्न वाढवले. खोटे बोलून देशातील १४० कोटी जनतेची मोदी यांनी फसवणूक केली आहे. दहा वर्षांत केलेल्या एकाही घोषणेची त्यांनी अंमलबजावणी केली नाही. ईडी, आयकर विभागाची भीती दाखवून भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना स्वच्छ करत आहेत. इंडिया आघाडीची ही लढाई देशातील हुकूमशाही भाजपाविरोधात आहे. देशातील जनताही पेटून उठल्याने ३०० पेक्षा जास्त जागा इंडिया आघाडी मिळणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
घटना बदलण्याचे भाजपला डोहाळे
भाजपचे खासदारही जाहीर सभामध्ये आम्हाला देशाची घटना बदलण्यासाठीच ४०० जागा पाहिजेत. भाजपच्या नेत्यांना भारताची घटना बदलण्याचे डोहाळे लागले आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
'विश्वजीत'साठी सांगली सोडली असती
पहिल्या दिवशी मला जर समजलं असतं की, सांगलीत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम लढणार असते, तर मीसुद्धा ही जागा सोडली असती. इथल्या भविष्याच्या आड शिवसेना अजिबात येणार नाही, असे ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
देशाचे भविष्य १४० कोटी मतदारांच्या हाती
देशातील १४० कोटी जनतेमध्ये एकाच व्यक्तीला किती दिवस सत्तेवर ठेवणार आहे. देशाचे भविष्य हे नरेंद्र मोदी यांच्या हाती नाही, तर मतदारांच्या हाती आहे, असेही ठाकरे म्हणाले.
पूर, दुष्काळावेळी मोदी, शाह कुठे होते?
महाराष्ट्रावर दुष्काळ, पुराचे संकट आले त्यावेळी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह कुठे होते? हे नेते महाराष्ट्रात कुठेच दिसले नाहीत. महाराष्ट्राला नेहमी वाईट नजरेने पाहणाऱ्यांना परत पाठविण्याची वेळ आली आहे, असा टोलाही ठाकरे यांनी मोदी, शाह यांना लगावला.
मी आजारी असताना पक्ष फोडला
मी आजारी होतो. हातपायही हलविता येत नव्हते. अशावेळी माझी शिवसेना फोडली आणि आता तुम्ही माझं कौतुक करता, माझं कौतुक करू नका, करायचेच असेल तर शिवसेनेचे करा, असेही ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.
भाजपात ये नाही तर तुरुंगात
तोडा फोडा आणि राज्य करा, ही नीती वाढली आहे. भाजपमध्ये ये नाही तर तुरुंगात जा... काहीजण उघड उघड जात आहेत. काहीजण छुपी मदत करीत आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.