नेवरी औट-पोस्टला इमारत मिळेल का?
By admin | Published: July 20, 2014 11:40 PM2014-07-20T23:40:49+5:302014-07-20T23:41:29+5:30
ग्रामस्थांचा सवाल : पोलीसप्रमुखांनी लक्ष घालण्याची मागणी
गणेश पवार - नेवरी
नेवरी (ता. कडेगाव) येथील येरळा काठावरील सर्वच गावांसाठी सोयीकरिता नेवरी येथे पोलीस औट-पोस्ट सुरू करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्या अनुषंगाने माजी जिल्हा पोलीसप्रमुख कृष्ण प्रकाश यांनी येरळा काठावरील चोरीचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता व लोकांची कामे जागीच पूर्ण व्हावीत, यासाठी पोलीस औट-पोस्ट सुरू करण्यात आले; मात्र पोलीस औट-पोस्टसाठी इमारत होणार की नाही, याबाबत ग्रामस्थांतून साशंकता व्यक्त केली जात आहे. याकरिता जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
नेवरी (ता. कडेगाव) येथे येरळा काठावरील अकरा ते बारा छोट्या-मोठ्या गावांचे कामकाज नेवरी पोलीस औट-पोस्टला चालते. याठिकाणी जे. व्ही. निकम, विवेक शिंदे आदींसह पाच पोलीस लोकांचा स्टाफ उपलब्ध आहे. याठिकाणी २३ जुलै २०११ पासून हे काम सुरळीत सुरू आहे. गावच्या शाळेमध्ये जुन्या शाळेमध्ये दोन खोल्या भाड्याने घेऊन हे औट-पोस्ट सुरू आहे. संबंधित ग्रामस्थांनी पोलीस औट-पोस्टसाठी इमारत व्हावी, याकरिता जिल्हा पोलीस मुख्यालय यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रे पूर्ण करून पाठपुरावा केला आहे; मात्र नेवरी पोलीस औट-पोस्टच्या इमारतीकडे संबंधित खाते सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत आहे.
याबाबत नुकत्याच पार पडलेल्या गणपती उत्सव शांतता ग्रामपंचायत बैठकीत ग्रामस्थांनी पोलीस औट-पोस्ट इमारत व्हावी, अशी मागणी सध्याचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्याकडे केली आहे. ग्रामपंचायतीने मागणीनुसार पोलीस मुख्यालयाकडे जागाही देऊ केली आहे.
प्रशासनाच्या गांधारीच्या भूमिकेमुळे जागा देऊनही अद्याप कोणताही निधी, पाऊल उचलले नसल्याने ग्रामास्थांत इमारत कधी होणार, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. नेवरी पोलीस औट-पोस्ट इमारतीसाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी विशेष खास बाब म्हणून लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.